Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जाणून घ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेबाबत सविस्तर माहिती

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची थेट कर्ज योजना

मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील दारिरेषेखालील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत कर्जमर्यादा रक्कम रूपये २५ हजार वरून एक लाख रूपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेसाठी सध्या कर्ज मागणी अर्ज वितरण सुरू असून, २० डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टी. आर. शिंदे यांच्याकडून या योजनेची जाणून घेतलेली ही अधिक माहिती

कर्जविषयक माहिती : कर्जामध्ये महामंडळाचा हिस्सा रु. ८५,००० (८५%), अनुदान रक्कम रु. १०,००० (१०%), अर्जदाराचा सहभाग रु. ५,००० (५%) असे एकूण १ लाख रुपये कर्ज (१००%) देण्यात येते. तीन वर्ष (३६ महिने) कालावधीसाठी दर साल दर शेकडा ४ टक्के व्याजदराप्रमाणे कर्ज दिले जाते. या योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यासाठी  एकूण ६५ लाभार्थींचे रक्कम रु. ६५ लाखांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

उद्दिष्ट वितरण : या योजनेत साधारणपणे पुरुष ५० टक्के व महिला ५० टक्के आरक्षण राहील. ग्रामीण भागासाठी प्राधान्य राहील. राज्यस्तरावरील क्रीडा पुरस्कारप्राप्त व्यक्तिंना प्राधान्य राहील. सैन्य दलातील वीरगती प्राप्त वारसाच्या घरातील एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यात येईल.

पात्रता व निकष : अर्जदार मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा जातीतील असावा. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष असावे. अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराने अर्जासोबत आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव/प्रशिक्षीत असावा. अर्जदाराचा Cibil Credit Score ५०० च्या वर असावा.

आवश्यक कागदपत्रे : सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला जातीचा दाखला, अर्जदाराच्या कुटुंबाचा तीन लाख रुपयांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला, नुकतेच काढलेले दोन फोटो, अर्जदाराचा शैक्षणिक पुरावा/शाळेचा दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा आहे, त्या जागा उपलब्धतेचा पुरावा ( भाडे पावती, करारपत्र), व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र व अनुभव दाखला, यापूर्वी शासकीय कर्ज योजनेचा व अनुदानाचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, शॉप ॲक्ट/ग्रामसेवकाचे व्यवसाय करण्यास ना हरकत दाखला. व्यवसायासंदर्भात साहित्य/माल खरेदीचे दरपत्रक/कोटेशन, अर्जदारास महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक ती कागदपत्रे प्रमाणपत्रे/करारपत्रे कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

कर्ज प्रक्रिया : कर्ज प्रकरण कार्यालयाकडे प्राप्त झाल्यास, परिपूर्ण असे कर्ज प्रस्ताव लाभार्थींच्या निवडीसाठी, प्रथम लाभार्थी निवड समितीच्या मान्यतेसाठी व मंजूरीस्तव सादर करण्यात येतील. प्राप्त झालेल्या कर्ज प्रस्तावाची संख्या उद्दिष्टांपेक्षा जास्त असल्यास, लाभार्थींची निवड चिठ्ठीव्दारे (लॉटरी पध्दतीने) करण्यात येईल. अर्जदाराच्या Cibil Credit Score‍ ५०० च्या वर आहे किंवा कसे याबाबत कर्ज मंजूर झाल्यानंतर अहवाल सादर करावा लागेल. कर्ज मंजुरीची प्रक्रिया झाल्यानंतर कर्ज प्रकरणी कर्ज वसुलीसाठी दोन सक्षम जामिनदार घेण्यात येतील. सहभाग रक्कमेपोटी ५ हजार रूपयांचा धनाकर्ष  महामंडळाच्या नावे जमा करावा लागेल. कर्ज वितरणापूर्वी लाभार्थीकडून वसुलीपोटी २० उत्तर दिनांकित धनादेश घेण्यात येतील. कर्जदाराच्या वारसाचे १०० रूपयांच्या बाँडवर वारसदार म्हणून प्रतिज्ञापत्र, इतर वैधानिक दस्ताऐवजांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. ३ वर्ष (३६ महिने) कालावधीसाठी दर साल दर शेकडा ४ टक्के व्याजदराने कर्ज रक्कम वितरीत केली जाईल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *