स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी सारख्या नालायक माणसाने संसदेत पोहोचता कामा नये – उद्धव ठाकरे
सांगली: मी शेतकरी नेता नाही, तर मी शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतकऱ्यांच्या डोळय़ातील अश्रू, त्यांचे भाव मला कळतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीच मी युती केली आहे; असे भावनिक वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इस्लामपूर (ईश्वरपूर) येथील जाहीर सभेत केले आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर येथे काल सभा घेण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांवर गोळीबार करणारे, शेतकऱ्यांचे रक्त सांडणारे नतद्रष्ट काँग्रेस, राष्ट्रवादी कोणत्या तोंडाने मते मागत आहेत, असा थेट सवालच उद्धव ठाकरे यांनी केला.
ईश्वरपूर ही वीरांची भूमी आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पत्री सरकार स्थापन करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. संसदेत मराठीत भाषण करणारे क्रांतिसिंह हे पहिले नेते होते. मुंबई ही महाराष्ट्रातच राहणार असे पंडित नेहरूंना त्यांनी ठणकावून सांगितले होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेने राज्यातील जवळपास एक हजार शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या विवाहाचा प्रश्न सोडविला याचे समाधान आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच नाशिकहून शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत येत होता. शेतकऱ्यांचे पाय रक्ताळले होते. या हजारो शेतकऱ्यांच्या राहण्याची, जेवणाची सोय शिवसेनेने केली. शेतकऱ्यांच्या या रक्ताशी माझे जिव्हाळयाचे नाते आहे. हे नाते कायम राहणार आहे, असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकराना भित्रा म्हणतात. देशासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानच्या तुरुंगात प्रचंड यातना भोगल्या. त्यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीसारख्या नालायक माणसाने संसदेत पोहचता काम नये असा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींवर टीकाशस्त्र सोडले.
यावेळी शिवसेना नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.
