आम्ही दगा करणार नाही, तुम्ही दगा करु नका – उद्धव ठाकरे
मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली त्यामध्ये उद्धव यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाने युती केली. युती झाल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. तसेच विरोधकांनीदेखील शिवसेनेवर टीका केली होती. यावर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधी मी एका वेगळय़ा भूमिकेत होतो. पण गेली चार ते पाच वर्षं शिवसेना सातत्याने जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करत होती. संपूर्ण देशात विरोधी पक्ष एकत्र येऊन सुद्धा जनतेचा आवाज कुणी उठवत नव्हतं, तेव्हा एकटी शिवसेना जनतेचा आवाज बुलंदपणे उठवत होती. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे एकदा नव्हे, तर दोन वेळा मला भेटायला मातोश्रीवर आले. तेव्हा मी त्यांच्यासमोर जनतेचे प्रश्न मांडले. त्यांना माझे सगळे म्हणणे पटले आणि त्यावर उपाययोजना सुरू करण्याचे त्यांनी मला आश्वासन दिले,
तर मग संघर्ष कशासाठी करायचा? म्हणून युती केल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.
…तर मी पुन्हा अयोध्येला जाईल
राम मंदिराच्या प्रश्नावरून भाजपवर पुन्हा एकदा त्यांनी निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीनंतर राममंदिराच्या उभारणीला गती मिळाली नाही तर मी पुन्हा अयोध्येत जाईन, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना, ‘काँग्रेसमुक्त भारत झाल्यास या देशातील सगळे प्रश्न संपतील असं आपल्याला वाटतं का?’ असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदींच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ या भूमिकेला आपला विरोध असल्याचे उद्धव यांनी सांगितले. ‘काँग्रेसमुक्त देश किंवा काँग्रेस नष्ट करा असं मी कधीच बोललो नाही. विरोधी पक्ष राहिलाच पाहिजे. विरोध करणं म्हणजे आकांडतांडव करणं नाही. त्याच्यावरसुद्धा जबाबदारी असते. जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका त्याला जास्त पार पाडावी लागते. तसं जर का बघितलंत तर कुणालाही नष्ट करा असं मी कधी म्हणत नाही. नष्ट करा किंवा काँग्रेसमुक्त…हे मुक्त, ते मुक्त या अशा फालतू कल्पना माझ्याकडे नाहीत. फक्त आज काँग्रेसची अवस्था ही योग्य नाही हे नक्की,’ असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
आम्ही दगा करणार नाही, तुम्ही दगा करु नका
तसेच आम्ही दोघांनी ‘युती’ म्हणून देशात संघर्ष केला आहे. काय वातावरण होतं तेव्हा देशात? हिंदू म्हणवून घेणं हा गुन्हा होता. हिंदुत्व ही शिवी होती. हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद असा उल्लेख सुरू झाला होता. या देशातील हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला लावीन असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं, ते दिवस आले. मग आता समज-गैरसमज दूर केले नाहीत तर दोघांचे नुकसान ठरेल. दैव देते आणि कर्म नेते अशी आपली स्थिती होईल. युती टिकविण्यासाठी प्रामाणिकपणा हवा, आम्ही कोणाला दगा देणार नाही. कुणी आम्हाला दगा देऊ नये ही आमची साधी भूमिका आहे. असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला केले आहे.
