ठरलं! ७ ऑक्टोबरपासून सर्व धर्मीय प्रार्थनास्थळं पुन्हा उघडणार
मुंबई, दि.२५: नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातली सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळं आरोग्याचे नियम पाळून भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालंच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
दुसऱ्या लाटेचा सामना केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे नियोजन केलं आहे. हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल केले जात आहेत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला आहे.
Source – AIR
