पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी केली ‘मन की बात’
कोरोनाविरुद्धचा लढा जिंकण्यासाठी दवाई भी और कडाई भी हा मंत्र कधीही विसरु नका असं आवाहनही त्यांनी केलं. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे सामना केल्यानंतर देशात नवा आत्मविश्वास निर्माण झाला होता, मात्र दुसऱ्या लाटेनं आपल्याला हादरवून टाकलं असल्याची खंतही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
मात्र या संकटाचा सामना करण्यासाठी आपण औषध उद्योग, लस उत्पादन तसंच ऑक्सिजनच्या निर्मितीशी संबंधित लोकं आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञांशी चर्चा केली आहे. यापुढे ला लढा जिंकण्यासाठी, तज्ञ आणि वैज्ञानिक सल्ल्याला प्राधान्य द्यायचं आहे असं ते म्हणाले.
राज्य सरकारंही आपापली जबाबदारी प्रयत्नपूर्वक पार पाडत असून, केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली. कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय क्षेत्रासह, आघाडीवर राहून काम करत असलेले करोनायोद्धे, तसंच समाजसेवी संस्थांसोबतच समाजातले सर्वच घटक एकजुटीनं लढा देत असल्याचं ते म्हणाले.
कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी शहरांसोबत गावागावांमध्ये नियमांचं काटेकोरपणे पालन, आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या या संकटकाळात लसीचं महत्व सगळ्यांनाच पटलं आहे, त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता लस घ्यावी, पण त्यानंतरही सतर्क रहावं असं आवाहनही त्यांनी केलं.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविषयी नागरिकांचे गैरसमज आणि त्यांच्या मनातला तणाव दूर करण्याच्यादृष्टीनं कोरोनाबाधितांवर उपाचर करणारे मुंबईतील डॉ. सशांक जोशी, तसंच श्रीनगरमधले डॉ. नाविद शाह यांच्याशी संवाद साधला.
कोरोनाकाळात देशातल्या परिचारिका देत असलेल्या अविरत सेवेबद्दल जनतेला जाणून घेता यावं यासाठी प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमधून रायपूर इथल्या एका रुग्णालयातल्या सिस्टर भावना ध्रुव आणि बंगळूरू इथल्या सिस्टर सुरेखा यांच्याशी संवाद साधला.
प्रेम वर्मा या रुग्णवाहिका चालकाशी संवाद साधून त्यांनी रुग्णवाहिका चालकांनी दिलेल्या सेवेचं महत्वही आजच्या संवादातून मांडलं. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या अनुभव नागरिाकांच्या कामी यावेत यासाठी त्यांनी गुरूग्राम इथल्या प्रीती चतुर्वेदी यांच्याशीही संवाद साधला.
भगवान महावीरांच्या जयंतीच्या शुभेच्छा त्यांनी देशवासीयांना दिल्या. सध्या सुरु असलेला रमझानचा महिना काहीच दिवसात येणारी बुद्धपौर्णिमा, गुरु तेगबहादूर यांचं ४००वं प्रकाश पर्व आणि टागोर यांच्या जयंतीचा दिवस आपल्याला प्रेरणा देत राहिल असं ते म्हणाले.
