सचिन वाझे यांना २५ मार्चपर्यंत कोठडी
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीमध्ये आढळलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडल्याच्या घटनांची राष्ट्रीय तपास संस्था आणि दहशतवादविरोधी पथकामार्फत चौकशी केली जात आहे. या चौकशीतून जे काही निष्पन्न होईल, त्यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून कायदेशीर कारवाई केली जाईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
भाजप नेत्यांनी सचिन वाजे यांचा मुद्दा पुढे करून राज्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, हा तपास केंद्रीय यंत्रणांकडे आहे त्यामुळे कोणीही त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्न नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिली आहे. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनाच अटक होते ही गंभीर बाब असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. हे प्रकरण वाझेंपुरतं मर्यादित नसून आणखीही काही जणांचा यात समावेश असावा अशी शंकाही फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
