केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेसने जमा केल्या महाराष्ट्रातल्या ६० लाख शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या
मुंबई: केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनात संमत केलेल्या कृषी काद्याच्या विरोधात, काँग्रेसने राबवलेल्या मोहीमेत महाराष्ट्रातल्या ६० लाख शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या जमा केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचं हे निवेदन, राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे, मुंबईत टिळक भवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात सुपुर्द केलं.
इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या गोळा होण्यातून, या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असल्याचं स्पष्ट होतं असं थोरात यांनी म्हटलं आहे. या कायद्याविरोधातलं देशभरातल्या शेतकऱ्यांच्या सह्यांचं निवेदन, १९ नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिलं जाणार असल्याचंही थोरात यांनी सांगितलं. हे कृषी कायदे रद्द करेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरुच राहील असंही थोरात यांनी यावेळी स्पष्ट केलं.
