५५ तासांच्या आत अभिनंदन वर्धमान पाकिस्तान कडून भारताकडे सुपूर्द
अवघ्या 55 तासांमध्ये भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने भारताच्या ताब्यात सोपवलं आहे. भारताच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान प्रत्यार्पण मानलं जात आहे. काल संध्याकाळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वर्धमान यांना पुन्हा भारताकडे सोपवण्यास संमती दर्शवली होती. वाघा बॉर्डरमार्गे अभिनंदन वर्धमान हे मायदेशी परत आले आहेत.
भारताचे विंग कमांडर अभिनंदन मायदेशी परतल्यामुळे वाघा बॉर्डरसह देशभरात आनंदाचं वातावरण आहे. अभिनंदन यांचे कुटुंबीयही वाघा बॉर्डरवर त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित झाले आहेत. भारतात परतल्यानंतर भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातून त्यांना अमृतसर एअर बेसला नेण्यात येत आहे. तिथून ते राजधानी दिल्लीला रवाना होतील.
