Fighter Jet
भारताने पाक कडून घेतला बदला, ‘जैश’च्या तळावर टाकला एक टनचा बॉम्ब
पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफ ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बद्दला भारतीय हवाई दलाने आज पहाटे घेतला आहे.
पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई केली आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी आज पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मिर मध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब टाकला. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले.
भारताने केलेल्या या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगितले जाते. या हल्ल्यात किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. यामध्ये सैन्याने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या कारवाईपेक्षा मंगळवारी सैन्याने केलेली हवाई कारवाई खूप मोठी आहे. १२ मिराज विमानांनी आकाशात झेपावत पाकव्याप्त काश्मीरमध्ये १ हजार किलो बॉम्ब टाकले. विशेष म्हणजे कारवाई पूर्ण करून कोणत्याही नुकसानाशिवाय विमाने सुरक्षित भारतात परतली आहेत.
दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यचं कारवाईबाबत निर्णय घेईल, असे म्हटले होते. सैन्याला कारवाईची वेळ, ठिकाण आणि पद्धत ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. तसेच दहशतवाद्यांनी खूप मोठी चूक केली असून त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, अशी धमकी दिली होती.
