Mumbai_Suburban_Railway-Web
परळ टर्मिनस वरून 32 परळ लोकल धावणार
मुंबईतल्या दादर स्थानकातील गर्दी विभागण्यासाठी परळ उपनगरीय टर्मिनसमधून ३२ लोकलफेऱ्या चालवून या टर्मिनसचे लोकार्पण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. येत्या महिन्यातल्या रविवारी, 3 मार्च रोजी त्याचे उद्घाटन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यामुळे दादर, परळ स्थानकांतून रोज प्रवास करणाऱ्या साडेतीन लाखांहून अधिक प्रवाशांना काहीअंशी सुखद दिलासा मिळणार आहे.
पुर्वेला देशातील कॅन्सरवर उपचार देणारे सर्वात मोठे टाटा रुग्णालय, केईएम, वाडिया रुग्णालय आणि पश्चिमेला कॉर्पोरेट इमारती असल्यामुळे मध्य रेल्वेवरील वर्दळीच्या स्थानकांमध्ये परळ स्थानकाचा समावेश होतो.
तसेच दादरवरून पश्चिम रेल्वेला जाण्यापेक्षा परळवरून पादचारी पुलाने पश्चिम रेल्वेचे प्रभादेवी (एल्फिन्स्टन रोड) स्थानक गाठून चर्चगेट तसेच विरार दिशेला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
परळ उपनगरीय टर्मिनसवरून पहिल्या टप्यात अप आणि डाऊन दिशेला धावणाऱ्या प्रत्येकी १६ एकूण ३२ लोकलफेऱ्या मार्गस्थ होतील. परळ येथून सकाळी 8.38 वाजता पहिली लोकल धावणार असून शेवटची लोकल रा.11.15 वाजता सुटणार आहे.
परळ टर्मिनसमध्ये आधुनिक इंडिकेटर, सरकते जिने, परळ व प्रभादेवी स्थानकांना जोडणाऱ्या पादचारी पूलासह एकूण तीन पादचारी पूल अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
