महायुतीचे नेते एकत्र दिसतात. मग शरद पवार आणि राहुल गांधी का नाही? : उद्धव ठाकरे
मुंबई: शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीची जाहीर प्रचारसभा शुक्रवारी वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली.
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा विचार आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी दिला. आम्ही युती केली जाहीरपणे केली. आम्ही कधी चोरून मारून कोणतीही गोष्ट केलेले नाही. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरताना गांधीनगरला गेलो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अर्ज भरताना वाराणसीमध्ये गेलो. वाराणसीत प्रचार रॅलीमध्ये जमलेली गर्दी हे सर्व काही सांगून गेली. ही दृश्य डोळ्यांमधे साठवून ठेवावी अशी आहेत. महायुतीचे नेते एकत्र दिसतात. मग शरद पवार आणि राहुल गांधी का नाही? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांना विचारला.
शरद पवार आणि राहुल गांधी यांची एकत्रित सभा पाहिली नाही. जे मनाने एकत्र येत नाही, ते सरकार बनवण्यासाठी एकत्र कसे येणार असे वाटते. जी लोकं मनाने एकत्र येऊ शकत नाहीत ते देशाची लढाई एकत्र लढू कसे शकतात, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
पाकिस्तानने युद्ध केले तर नुसते त्यांना खलिते पाठवत बसण्याऐवजी त्यांचे कंबरडे मोडले जाते हे आम्हाला मोदींनी दाखवून दिले आहे. त्यामुळेच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला पाठिंबा दिला. देशाचे तुकडे करायला काहीजण निघाले आहेत, मात्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊन त्यांना फासावर लटकवतील आणि देशाचा तिरंगा शाबूत ठेवतील, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
वंदे मातरम देशाला देणाऱ्या बंगालमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी बांगलादेशी कलाकार बोलवावे लागतात त्यावरुन त्यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली. भगवा हा विचार आहे. समविचारी पक्ष म्हणून एकत्र आलो आहोत. आमच्याकडे विरोधकांसारखा मिनिमम नाही. मॅक्सिमम प्रोग्रॅम आहे. देशाचा विकास करणारा. अयोध्येत राम मंदिर बांधणार. हिंदुत्व आमचं राष्ट्रीयत्व आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मेहबुबा मुफ्ती या ३७० कलम रद्द झाले तर कश्मीरात तिरंगा फडकवायला एकही व्यक्ती शिल्लक राहणार नाही अशा वल्गना करीत आहे, तर दुसरीकडे देशद्रोहाचे कलमच रद्द करण्याचे वचन विरोधकांच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे, पण काहीही झाले तरी आम्ही ३७० कलम काढणार म्हणजे काढणारच. आमचा देशाभिमान केवळ घोषणा देण्यापुरताच नाही. देशाचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्या औलादीला फासावर लटकवायचे नाही तर काय त्यांच्यासमोर पुंगी वाजवायची? जो देशद्रोही असेल त्याला फासावर लटकवणारच, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली.
मोदीजी तुम्ही चिंता करू नका हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. संपूर्ण मुंबई तुमच्या पाठीशी ताकदीने उभी होती व नेहमीच राहील. शिवसेनाच नव्हे तर सर्व मित्र पक्ष तुमच्या पाठीशी उभे आहेत हे मी आपणाला वचन देतो, असेदखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
