सिडको ला ग्रामस्थांकडून निवेदन
उरण, दि.१७(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील डोंगरी फुंडे पाणजे या तीन गावांना जोडणारा पूल ५ महिन्यांपूर्वी कोसळला होता. दुर्दैवाने उरण मधील एकाचा यात मृत्यू झाला होता. डोंगरी, फुंडे, पाणजे या तिन्ही गावांना सर्वात जवळचा मार्ग म्हणून नागरिकांची या पुलावरून ये-जा सुरु होती. मात्र पुलच कोसळल्याने या तिन्ही गावातील नागरिकांचा संपर्क तुटला असून दैनंदिन प्रवास करणेही त्रासदायक ठरत आहे.
नागरिकांना दुसऱ्या मार्गाने प्रवास करून आपले गाव गाठावे लागत आहे. त्यामुळे वेळ व पैसा दोन्ही जास्त प्रमाणात खर्च होत आहे. वेळ व पैशाची बचत व्हावी, नागरिकांचा त्रास वाचावा यासाठी या ठिकाणी लवकरात लवकर त्वरित नवीन पूल बांधावा व नवीन पूल तयार होईपर्यंत तिथेच बाजूला पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी अशी मागणी डोंगरी ग्रामपंचायती मार्फत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता यांना सिडको कार्यालय उरण येथे निवेदन देऊन करण्यात आली.

कामगार नेते महादेव घरत, डोंगरी ग्रामपंचायतचे सरपंच-निलेश घरत, डोंगरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच-किरण घरत आदींच्या हस्ते हे निवेदन कार्यकारी अभियंता मुंडे यांना देण्यात आले व समस्येबाबत चर्चाही करण्यात आली.
