“..जर तात्काळ काही हालचाल झाली तर बरं नाहीतर सरळ अधिवेशनादरम्यान आम्ही योग्य ती अॅक्शन घेऊ” – अतुल शिलवंत
उलवे(नवी मुंबई), दि. ६: स्वतःला ‘शहरांचे शिल्पकार’ म्हणवून घेणार्या सिडको(CIDCO) महामंडळाने गेल्या ५० वर्षांत टप्प्या-टप्प्याने नवी मुंबईतील विविध नोड ची उभारणी केली. परंतू, मागील काही वर्षांपासून सिडको चा कारभार काहीसा राम भरोसेच चालू असल्याचे पाहायला मिळतेय. सिडको ने नव्याने विकसित केलेल्या उलवे नोड मध्ये याच अजब कारभाराचा नमूना समोर आला आहे. जवळपास २६ सेक्टर्स असलेल्या व पावणेदोन लाख लोकसंख्या असलेल्या उलवे नोड मध्ये सार्वजनिक मुतार्या/शौचालयांची वानवा असल्याबाबत २०२२ सालापासून वरिष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अतुल शिलवंत हे सिडको प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. या संबंधी वेळोवेळी सिडको कडून फक्त आश्वासनच दिली जात आहेत.
जवळपास दोन लाख इतकी लोकसंख्या असलेल्या उलवे नोड सारख्या स्मार्ट सिटि मध्ये सार्वजनिक शौचालयांची वानवा असणे नक्कीच भूषावह नाही. एकवेळ पुरुषाला लघवीला झाली तर नाईलाजास्तव का असेना तो कुठेतरी कोपरा पाहून लघुशंका करू शकतो पण महिलांचे काय? त्यांनी कुठे जायचं? घरातून कामानिमित्त अथवा शाळा-कॉलेज साठी बाहेर पडणार्या महिला वर्गाला जर लघुशंकेला जाण्याची आपत्कालीन परिस्थिति उद्भवली तर त्यांना वाट पाहत आपल्या इस्पित स्थळी पोहोचण्याशिवाय गत्यंतर नाही. भविष्यात यामुळे त्यांना गंभीर शारीरिक व्याधींचा सामना करावा लागू शकतो. याच सोबत मधुमेह, मूत्रपिंडाशी निगडीत आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे तर खूपच हाल होत आहेत.”
या बाबत सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांशी केलेल्या पत्रव्यवहारात त्यांनी म्हंटलं होतं की, “मी व माझे सहकारी या पत्राच्या माध्यमातून आपणांस विनंती करतो की आपण सिडको च्या संबंधित विभागास उलवे नोड येथील प्रत्येक सेक्टर मध्ये एक सार्वजनिक शौचालय उभारण्याचे तात्काळ निर्देश वजा आदेश द्यावेत व येथील नागरिकांना विशेषतः स्त्रिया व रुग्णांना भोगाव्या लागणार्या नरक यातनांतून त्यांची सुटका करावी.” या समस्ये संदर्भात महाराष्ट्र वार्ता शी बोलताना ते म्हणाले की सिडको सारख्या सक्षम यंत्रणेकडून एवढ्या महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष कसे होऊ शकते हा मोठा सवाल मला पडला आहे. येत्या २३ फेब्रुवारी २०२६ पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या पूर्वी आम्ही सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक व नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांची भेट घेणार आहोत व उलवे नोड परिसरात सार्वजनिक शौचालय व मुतार्यांची युद्ध पातळीवर उभारणी करण्याची मागणी करणार आहोत. जर तात्काळ काही हालचाल झाली तर बरं नाहीतर सरळ अधिवेशनादरम्यान आम्ही योग्य ती अॅक्शन घेऊ असा इशारा त्यांनी शेवटी दिला.
या सार्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न चमकून जातो तो म्हणजे, जवळपास २६ च्या वर सेक्टर्स(विभाग) व आज मितीस एक सोडून दोन उपनगरीय रेल्वे स्थानकं असलेल्या उलवे नोड ची उभारणी करताना सिडको महामंडळ शहरातील नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालयं बांधायला नेमकं कसं काय विसरलं? या ठिकाणी मुळात शहराच्या आकारमानासोबत लोकसंख्या वाढत असताना प्रशस्त रस्ते, गटारं यांची उभारणी करताना मुतार्या-शौचालयं बांधण्याचा विचार सिडको सारख्या नगर नियोजनकर्त्यांच्या डोक्यात कसा आला नाही हे खरंच एक मोठं कोडं आहे.
सामाजिक कार्यकर्ते अतुल शिलवंत यांनी उलवेकरांना आपल्या या मोहीमेत सामील होण्याचं आवाहन केलं आहे. मोहिमेत सामील होण्यासाठी अतुल शिलवंत यांना +91 93247 75536 क्रमांकावर व्हाट्सअप मार्फत संपर्क साधता येऊ शकतो.
