…. तर मिशाच नाही भुवयाही काढून फिरेन; छत्रपती उदयनराजेंचा निवडणूक आयोगाला ओपन चॅलेंज
मुंबई: EVM फेरफार चं वादळ शांत व्हायचं नाव घेताना दिसत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस चे सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले या विषयाचा पिच्छा सोडण्याची चिन्ह काही दिसत नाहीत. दोन दिवसांपूर्वी फेसबुक पोस्ट द्वारे त्यांनी सर्वात आधी EVM बाबत शंका उपस्थित केली. काल पुन्हा मुंबईत एक विशेष पत्रकार परिषद घेऊन या बाबत त्यांनी नवीन आरोप केले.
सातारा लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत मला मिळालेली मतं व झालेलं मतदान यात तफावत असून बॅलेट पेपर वर फेरनिवडणूक घ्यावी आणि जर तरीही तफावत आढळली तर मिशाच नाही भुवयाही काढून फिरेन असे आव्हान उदयनराजे भोसले यांनी निवडणूक आयोगाला केले आहे. आपल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की देशातल्या प्रत्येक नागरिकाला वाटतं की आपला देश अबाधित राहिला पाहिजे. लोकशाही अबाधित राहिली पाहिजे. ईव्हीएमवर ५,००० कोटी रुपयांचा वायफळ खर्च झाला असून बॅलॉट पेपर वरची निवडणूक प्रक्रिया कमी खर्चाची आहे.
कोणतंही मशीन परिपूर्ण नसतं, त्यामुळे EVM पण परिपूर्ण नाही. न्यायालयाबद्दल पूर्ण आदर, पण न्यायालयं EVM वर भाष्य करू शकत नाहीत, तर इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरच करु शकतात. कॅम्पूटर हॅक होतात तर EVM पण होऊ शकतं. असे म्हणत त्यांनी ईव्हीएम बाबत च्या घोळावर निवडणूक आयोग व केंद्र सरकारला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
