एन्काऊंटर फेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश
मुंबई: एन्काऊंटर स्पेशलिस्ट पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी शिवसेना ठाणे संपर्क प्रमुख व मंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. त्यांना नालासोपारा अथवा अंधेरी मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट मिळू शकते अशी चर्चा आहे. या प्रवेशानंतर वसई-विरार पट्ट्यातील शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.
प्रदीप शर्मा हे १९८३ च्या बॅच चे पोलीस अधिकारी असून. १०० पेक्षा जास्त गुन्हेगारांचा खात्मा केल्यामुळे ते चकमक फेम अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. मधल्या काळात गुन्हेगारांशी संबंध असल्याचे व खोट्या चकमकीचे आरोप त्यांच्यावर झाले होते. पण त्यातूनही ते सहिसलामत सुटले.
