छत्रपती उदयनराजे भोसले यांचा भाजपात अमित शाह यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश
नवी दिल्ली: बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्रातल्या ज्या बड्या नेत्याच्या भाजप प्रवेशाची चर्चा चालू होती तो मुहूर्त आज साधला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर भाजप प्रवेश केला. यावेळी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
तत्पूर्वी सकाळी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्त केला त्यानंतर त्यांनी तो तत्काळ मंजूरही केला खासदार उदयनराजे यांच्या जाहीर प्रवेशाप्रसंगी ठरल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहू शकले नाहीत. व्यस्त वेळापत्रकामुळे ते कार्यक्रमाला गैरहजर होते असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले. येत्या विधानसभा निवडणुकी सोबत सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पुन्हा निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे ज्यात छत्रपती उदयनराजे भोसले भाजपचे उमेदवार असतील.