अचानक बाहेर आलेल्या दिशा सालियन मृत्युप्रकरणी सत्ताधाऱ्यांकडून विधानसभेत गदारोळ
मुंबई, दि. २०: दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंग यांच्या मृत्युनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह काही सेलिब्रिटींवर तत्कालीन विरोधक राहिलेल्या भाजप नेत्यांकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. राज्यात नागपूर दंगल घडल्यानंतर अचानक हे प्रकरण आता बाहेर आलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीच्या मुद्द्यावरून आज महाराष्ट्र विधानसभेत गदारोळ होऊन कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब झालं. दिशाच्या मृत्यूच्या एसआयटी चौकशीचा अहवाल त्वरित सादर करावा आणि सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे आरोप तिच्या वडिलांनी काल केले होते. त्यातल्या आरोपींची चौकशी करावी, गरज असेल तर त्यांना अटक करावी अशी मागणी आमदार अमित साटम यांनी केली. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्याचं आश्वासन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात दिलं.
या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांसह आरोप झालेल्या व्यक्तींना अटक करावी अशी मागणी नितेश राणे आणि शंभूराज देसाई यांनी केली. त्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी अध्यक्ष समोरच्या जागेत येऊन घोषणाबाजी केल्यानंतर कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब झालं. तत्पूर्वी, दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सीबीआयकडून सखोल आणि निःपक्षपाती चौकशी व्हावी या मागणीसाठी आज शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवन परिसरात फलक झळकावत मूक आंदोलन केलं.
Source – AIR
