राज्यात राष्ट्रपती राजवट लागू, विरोधकांकडून राज्यपालांवर पक्षपातीपणाचा अप्रत्यक्ष आरोप
महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षामुळे अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असून या संदर्भात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याजवळ केली होती.
सदर शिफारसीनंतर राष्ट्रपतींनी राष्ट्रपती राजवटीवरील अध्यादेशावर स्वाक्षरी केली.
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही २४ तासात सत्तास्थापनेचा दावा करण्याची मुदत मिळाली, जी मुळात आज रात्री ८:३० वाजेपर्यंतची होती. पण तत्पूर्वीच राज्यपालांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ जमा करणे शक्य आहे की नाही या बाबत विचारले. यावर राष्ट्रवादीनेही रात्री ८:३० पर्यंत सत्तास्थापनेचा दावा करणे अशक्य असल्याचे सांगितले.
काल युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी अशाच प्रकारे राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी कमी वेळ दिल्याची तक्रार केली होती. आज दिवसभर राज्यपालांच्या या कृतीवर काँग्रेससह कायदेशीर क्षेत्रातील असीम सरोदें सारख्या निष्णात वकिलांनीही प्रत्यक्ष टीका केली आहे.
