रायगडावर उत्साहात पार पडला शिवराज्याभिषेकदिन सोहळा
रायगड: काल मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनाचा सोहळा किल्ले रायगडावर मोठ्या दिमाखात पार पडला. या वेळी खासदार युवराज संभाजी राजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून पूजा केली.
वर्षागणिक राज्याभिषेक सोहळ्याला येणाऱ्या शिवभक्तांची संख्या वाढत आहे. या वर्षीही राज्याच्या काना-कोपऱ्यातून हजारो शिवभक्तांनी रायगडावर उपस्थिती लावली होती. डोक्यावर भगवे फेटे, कपाळावर चंद्रकोर अशा करारी रुपात अनेक शिवभक्त उठून दिसत होते. जणू शिवकाळ पुनः अवतरला होता. राज्याभिषेकदिन सोहळ्या निमित्त साहसी खेळांची प्रत्यक्षिकेही करण्यात येत होती. या वर्षीचा सोहळा उत्साहात व निर्विघ्नपणे पार पडला. गेल्या वर्षीच्या सोहळ्यात गडावरून उतरताना गर्दीमुळे एका शिवभक्ताचा वरून पडलेला दगड लागल्यामुळे प्राण गेला होता. या वर्षी गर्दीचं नियोजन योग्यरीत्या करण्यात आलं होतं त्यामुळे कसलीच आपदा ओढवली नाही.
