पुण्याची सांगली व्हायला फार वेळ नाही आता..लेखक प्रतीक पुरी यांचा इशारा
पुणे: सांगली-कोल्हापूरची जी दशा झाली त्याला निसर्गापेक्षा मानवी हलगर्जीपणा आणि बेपर्वाई वृत्ती जास्त जबाबदार आहे. नदी तीरावर दोन्ही बाजूंनी असलेली बेकायदेशीर बांधकामं ज्यामुळे नदी पात्रं रोडावली आहेत, त्यांतील मूळ स्त्रोत कचऱ्याने बुजले आहेत. त्यामुळे थोड्या पावसानंही पुराची परिस्थिती ओढवते आणि पुर ओसरायलाही वेळ लागतो कारण पाणी जमिनीत मुरण्यासाठी किंवा अन्यत्र वाहून जाण्यासाठी कसलेही मार्ग शिल्लक नाहीत. अफाट काँक्रिटीकरण, बेकायदा बांधकामं आणि नैसर्गिक नदी स्त्रोत व प्रवाहमार्गांचं होणारं आकूंचन यामुळे ही परिस्थिती ओढवू शकते हे याआधीच अनेक मान्यवर पर्यावरण तज्ञांनी सरकारला आणि जनतेलाही सांगितलं आहे. पण सरकारनं विकासाच्या नावाखाली त्या अहवालांना अडगळीत टाकलं आणि जनतेला स्वतःच्या घरापलीकडे फारकाही दिसत नाही त्यामुळे तेही अडचणीत सापडले आहेत. सध्याच्या अवस्थेत अशा कटू शब्दांची गरज असावी का हा प्रश्न आहे पण वास्तवाकडे आपण जर असेच डोळेझांक करत राहिलो तर मात्र येत्या काही काळांत याहून अधिक कठीण परिस्थिती ओढवेल.
पुणे शहर यात अतिशय धोकादायक वळणावर उभं आहे.
या शहराच्या मुख्य भागातूनच मुळा-मुळेचा प्रवाह गेला आहे. दोन्ही नद्यांच्या पात्रांत मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामं आहेत, रस्ते आहेत, भरीला आता मेट्रोही आहे. इथच सारा राडारोडा टाकला जातो, कचरा टाकला जातो. प्रशासन, सत्ताधारी आणि जनताही याकडे दूर्लक्ष करत आहे. मुठेचा धोका अधिक आहे कारण ती चॅनेलाईज्ड केलेली आहे. त्यामुळे तिला स्वतःच्या इच्छेनं वाहता येणंही कठीण झालं आहे. मागील काही वर्षांतलं निरिक्षण असं आहे की खडकवासल्यातील लहानशा विसर्गानेही मुठेचे दोन्ही तीर पाण्यानं भरून जातात. या पाण्याला जाण्यासाठी कोणताच मार्ग नाही. उद्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर धरणातील विसर्गाचं पाणी मुठेच्या दोन्ही बाजूंमधून थेट शहरात घुसण्याचा मोठा धोका आहे. तसं होऊ द्यायचं नसेल तर आत्तापासूनच लोकांनाच यात पुढाकार घेण्याची गरज आहे. पुण्या-मुंबईसारखी शहरं जेव्हा उध्वस्त होतात तेव्हा ती शहरंच नाही तर त्यामुळे राज्य आणि देशही प्रभावित होत असतो. कारण अशा मोठ्या शहरांतच देशाचं राज्याचं अर्थकारण एकवटलेलं आहे. याचाही विचार व्हायला हवा.
पण सध्या वातावरण असं आहे की लोकच काही करायला तयार नाहीत. एखादी मोठी आपत्ती ओढवली तर तेवढ्यापुरते लोक पेटून उठतात. पण ती आपत्ती का आली त्याचा विचार करत नाहीत. ती कशी टाळता आली असती त्याचाही विचार करत नाहीत. आणि ती आपत्ती मागे पडल्यानंतर पुन्हा सारे थंड होतात. त्यामुळे प्रशासन आणि सत्ताधारीही काही करत नाहीत. यांच्यावर जर दाबच ठेवला नाही तर हेच लोकांना टाचेखाली तुडवत राहतील. हा केवळ तात्कालिक प्रश्न नाही. तो कायमचा प्रश्न आहे. सर्व सार्वजनिक समस्यांच्या बाबतीत ज्या भीषण सहनशक्तिने आपण सर्व काही सोसत राहतोय त्यामुळे आपल्याला प्रशासनाला किंवा सत्ताधाऱ्यांना काही बोलण्याचा अधिकारच उरत नाही हेही कळत नाही लोकांना. तेव्हा आत्ताच जागे व्हा. प्रशासन आणि सत्ताधारी आपल्या सेवेसाठी आहेत. ते आपले मालक नाहीत. त्यांना प्रश्न विचारा. जाब विचारा. नाहीतर उद्या तुम्ही फुकट मराल तेव्हा खोटी सांत्वनं करण्यापलीकडे हे लोक काही करणार नाहीत.
- श्री. प्रतिक पुरी
(प्रतिक पुरी हे मराठीतील प्रतिथयश लेखक असून सामाजिक विषयांवरील आपल्या परखड मतांसाठी प्रसिद्ध आहेत)
