आरोग्य व्यवस्थेत नैतिकतेची गरज अधोरेखित; ‘पल्स वैद्यकीय परिषद २०२६’मध्ये तज्ज्ञांचे मत
मुंबई, दि. २९ : आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी नैतिक मूल्यांचा भक्कम पाया उभारणे ही काळाची गरज असल्याचा ठाम संदेश ‘मेडिकल इथीक्स इन इंडिया’ या विषयावरील चर्चासत्रातून देण्यात आला. रुग्णांचा विश्वास वाढविण्यासाठी आणि उपचार प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी डॉक्टरांनी नैतिकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे मत मान्यवर तज्ज्ञांनी व्यक्त केले.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरू असलेल्या ‘पल्स वैद्यकीय परिषद २०२६’ अंतर्गत आयोजित या चर्चासत्रात ॲडव्होकेट आणि मेडिकोलीगल तज्ज्ञ डॉ. गोपीनाथ एन. शेनॉय तसेच मेडिकोलीगल सल्लागार व रुग्णालय प्रशासक डॉ. सुगंथा अय्यर यांनी मार्गदर्शन केले. या सत्राचे समन्वयन महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी केले.
कायदेशीर व नैतिक निकषांचे ज्ञान आवश्यक
डॉ. गोपीनाथ एन. शेनॉय यांनी सांगितले की, वैद्यकीय क्षेत्रात वेगाने होत असलेली तांत्रिक प्रगती आणि उपचार पद्धतीतील वाढती गुंतागुंत लक्षात घेता डॉक्टरांनी कायदेशीर तरतुदी आणि नैतिक निकषांचे सखोल ज्ञान ठेवणे अत्यावश्यक आहे.
रुग्णाची माहितीपूर्वक संमती योग्य पद्धतीने नोंदविणे, उपचारांबाबत स्पष्ट माहिती देणे आणि पारदर्शक संवाद ठेवणे यामुळे भविष्यातील वाद टाळता येतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
रुग्ण-डॉक्टर नात्यात विश्वास महत्त्वाचा
डॉ. सुगंथा अय्यर यांनी रुग्ण-डॉक्टर नात्यातील विश्वासाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, रुग्णाला समजेल अशा भाषेत आजार, उपचार आणि संभाव्य जोखीम समजावून सांगणे ही डॉक्टरांची नैतिक जबाबदारी आहे.
रुग्णाच्या स्वायत्ततेचा आदर राखणे, गोपनीयतेचे पालन करणे आणि रुग्णहिताला प्राधान्य देणे या मूल्यांवर त्यांनी विशेष भर दिला.
‘सन्मानाने मृत्यू’ विषयावरही चर्चा
या चर्चासत्रात निष्क्रिय इच्छामरण आणि ‘सन्मानाने मृत्यूचा अधिकार’ या संवेदनशील विषयावरही सखोल चर्चा झाली. न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे या विषयाकडे अधिक स्पष्ट आणि जबाबदारीने पाहण्यास मदत होत असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले.
वैद्यकीय शिक्षणातील नैतिकतेची गरज
वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातही नैतिकतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन प्रक्रियेत शिक्षकांना अनेक नैतिक द्वंद्वांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी स्वतंत्र नैतिक मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
वैद्यकीय आचारसंहितेचे पालन आवश्यक
सत्राचे समन्वयक डॉ. विंकी रुघवानी यांनी सांगितले की, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ही डॉक्टरांच्या नैतिक आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करणारी महत्त्वाची संस्था आहे. डॉक्टरांनी नियमांचे काटेकोर पालन आणि सतत नैतिक प्रशिक्षण घेतल्यास आरोग्य व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विश्वासार्ह आणि पारदर्शक आरोग्य व्यवस्थेकडे वाटचाल
या चर्चासत्रातून आरोग्य क्षेत्रातील सर्व घटकांनी नैतिक मूल्यांचे पालन केल्यासच रुग्णकेंद्रित, पारदर्शक आणि विश्वासार्ह आरोग्य व्यवस्था उभारता येईल, असा स्पष्ट संदेश देण्यात आला.
