राज्यातील ८०० पोलिसांना महाराष्ट्र दिनी पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित केले जाणार
मुंबई: राज्य पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी आणि सलग १५ वर्षे उल्लेखनीय सेवा करणार्या तब्बल ८०० पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनी पोलिस महासंचालक पदकाने गौरविण्यात येणार आहे.
राज्यातील निवडक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची यादी पोलिस महासंचालकांना पोलिस आयुक्त व एसपी आणि विभागीय आयुक्त यांच्यामार्फत पाठवली जाते. त्यानंतर महासंचालक कार्यालयातील समितीकडून पडताळणी करून अहवाल सादर केला जातो. त्यावर पोलिस महासंचालक यांनी होकार दिल्यानंतर संबंधित कर्मचारी व अधिकारी यांची निवड केली जाते.
यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागात लाचखोराविरोधात कारवाई करून न्यायालयात आरोपींना शिक्षा होणे, तसेच नक्षलवादी भागात सलग तीन वर्षे सेवा, गंभीर गुन्ह्यांची उकल, गुन्हे अन्वेषण विभाग अशी उल्लेखनीय कामगिरी करणा-या आणि १५ वर्षे सलग सेवेत एकनिष्ठ राहणाऱ्या पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांची या पदकासाठी निवड केली जाते.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे शहर, पुणे ग्रामीण, कोल्हापूर, रायगड, गडचिरोली, भंडारा, चंद्रपुर येथील पोलीसांचा या यादीत समावेश आहे.
