दहशतवाद्यांशी लढण्याच्या भाजप व काँग्रेस च्या पद्धतीची तुलना होऊच शकत नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
राजस्थान: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.३) करोली-धौलपूर लोकसभा मतदारसंघातील हिंडन येथे एका सभेला संबोधित केले. ते म्हणाले की, “दहशतवाद्यांशी लढण्याची भाजप आणि काँग्रेस यांच्या पद्धतीची तुलना होऊ शकत नाही. काँग्रेस तर असं म्हणत आहे की मसूद अजहर ला ऐन निवडणुकीच्याच वेळी आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून का घोषित केले गेले? यासाठी संयुक्त राष्ट्राने कॅबिनेट ला विचारायला हवं होतं का?” असा सवालही त्यांनी काँग्रेस ला पुढे विचारला.
आपल्या भाषणात मोदी म्हणाले की सर्जिकल स्ट्राईक व एयर स्ट्राईक नंतर अतिरेकी मनसुबे असणाऱ्यांवर ही तिसरी स्ट्राईक झाली आहे. पाकिस्तानची हेकडी निघून गेली आहे. दहशतवाद्यांशी लढण्याच्या भाजप व काँग्रेस च्या पद्धतीची तुलना होऊच शकत नाही. काँग्रेस म्हणते की प्रत्येक दहशतवादी हल्ल्याशी निपटण अवघड आहे. पण आम्ही सिद्ध करून दाखवलंय की जम्मू-काश्मीर मधले दोन-तीन जिल्हे सोडले तर नागरिकांवर अथवा सेनेवर कोणीही हल्ला करू शकत नाही. आम्ही दहशतवादा विरुद्धचा आमचा संकल्प सिद्ध करून दाखवला आहे. पुढे मागील युपीए सरकारवर निशाणा साधत ते पुढे म्हणाले, “केंद्रात जेव्हा काँग्रेस चे सरकार होते, तेव्हा दहशतवादी हल्ले ही नित्याची बाब होती. कोणतेही शहर या शासनकाळात सुरक्षित नव्हते.”
लोकसभा निवडणुकीचे आता शेवटचे काही टप्पे बाकी आहेत. या टप्प्यातला प्रचारही आता शिगेला पोहोचला आहे. काँग्रेसनेही आता आक्रमक पद्धतीने प्रचार करत शेवटच्या टप्प्यातली चुरस वाढवली आहे.
