जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेचा निर्धार
नवी मुंबई, दि. ६: संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांच्यामार्फत या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना ‘प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन’ ही असून याकरीता नवी मुंबई महानगरपालिका मोठया प्रमाणावर विशेष मोहीम राबवित आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामधील प्लास्टिकमुक्त नवी मुंबईची संकल्पना प्रत्यक्षात साकारणारा ‘नवी मुंबई प्लास्टिक आणि ई-वेस्ट रिसायक्लोथॉन’ हा अभिनव उपक्रम महापालिका मुख्यालयापासून सुरु करण्यात आला. याप्रसंगी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ १ उपआयुक्त डॉ. अजय गडदे व परिमंडळ २ उपआयुक्त संतोष वारुळे आणि इतर विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व नागरिक तसेच प्रोजेक्ट मुंबई संस्थेचे अधिकारी धर्मराज सोळंकी आणि त्यांचे सहकारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी वातावरणातील कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी वृक्षारोपणाप्रमाणेच प्लास्टिकचा वापर थांबविणेही तितकेच गरजेचे असून त्यादृष्टीने प्लास्टिकमुक्त शहर साकारण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका पुढाकार घेऊन काम करीत असल्याचे सांगितले. यादृष्टीने प्रोजेक्ट मुंबई या संस्थेच्या सहयोगाने प्लास्टिक न वापरण्याविषयी जनजागृती, प्लास्टिकचे संकलन व त्याची विविध वस्तूंमध्ये पुनर्निमिती अशा व्यापक स्वरुपात हा उपक्रम राबविला जाणार आहे. या अंतर्गत पहिल्या टप्यात २०० हून अधिक ठिकाणी प्लास्टिक संकलनासाठी पेट्या ठेवल्या जाणार असून त्यामध्ये शाळा, मार्केट, मॉल, हॉटेल्स सोसायट्या अशा ठिकाणांचा समावेश असेल.
या संकलित प्लास्टिकपासून बेन्चेस, पेन, आकर्षक वस्तू बनविल्या जाणार असून त्याचा उपयोग उद्याने तसेच विविध गोष्टींसाठी केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात एकल वापर प्लास्टिकला प्रतिबंधित करण्यात आले असून याचेच अनुकरण इतर कार्यालयांनीही करावे असे त्यांनी सूचित केले.
नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी म्हणून आपण एक जबाबदार नागरिक बनत प्लास्टिकचा वापर करणार नाही असा निश्चय करुन त्याप्रमाणे वर्तणुक ठेवावी असेही आयुक्तांनी सूचित केले. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत प्रत्येक नागरिकाने प्लास्टिकचा वापर टाळण्याचे ठरविले तर आपण सर्व मिळून शहराचा कायापालट घडवू शकतो असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
कापडी कच-यापासून पुनर्प्रक्रिया उपक्रमांसाठी सोसायट्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या कापडी कचरा संकलन पेट्यांमधील एक पेटी महापालिका मुख्यालयात तळमजल्यावर ठेवण्यात आली. यामध्ये आयुक्तांसह मान्यवर अधिकारी वर्गाने वापरलेले कपडे टाकून या पेटी वापराचा आरंभ केला. याप्रसंगी चिल्ड्रन्स अकादमी, मालाड येथील विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या संकल्पनेतून प्लास्टिक बाटल्या व थर्माकोलपासून बनविलेल्या मोठया आकाराच्या नळाच्या आकर्षक प्रतिकृती निर्मितीबद्दल आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या विद्यार्थ्यांचे प्लास्टिक पूनर्प्रक्रियेतून निर्माण केलेले पेन देऊन अभिनंदन केले. प्रोजेक्ट मुंबई संस्थेचे अधिकारी धर्मराज सोळंकी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देत नवी मुंबईत हा उपक्रम नियोजनबध्दरित्या यशस्वीपणे राबवू असा निर्धार व्यक्त केला. यावेळी आयुक्तांसमवेत मोठया संख्येने उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर न करण्याची माझी वसुंधरा अभियान शपथ सामुहिकरित्या घेतली.
आपले नवी मुंबई शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी जागरुक नवी मुंबईकर नागरिक स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेतील व प्रोजेक्ट मुंबई या संस्थेसमवेत नवी मुंबई महानगरपालिका राबवित असलेल्या उपक्रमात सक्रीय सहभाग घेतील असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे या वेळी व्यक्त केला.
