‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे नवी मुंबई महापालिका हद्दीत आयोजन
नवी मुंबई, दि. २: केंद्र सरकारमार्फत १ जुलै ते ३१ जुलै कालावधीत ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियान राबविण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले असून त्यास अनुसरून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. त्यानुसार उद्यान विभागाच्या वतीने सेक्टर १९ धारण तलावाच्या परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये उद्यान विभागाच्या परिमंडळ २ उपआयुक्त नयना ससाणे, परिमंडळ २ चे उपआयुक्त संजय शिंदे यांच्या माध्यमातून स्वच्छताप्रेमी नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या सहभागातून धारण तलावाचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
अशाच प्रकारे ऐरोली येथील स्व. राजीव गांधी उद्यानाचीही सखोल स्वच्छता करण्यात आली. यामध्ये दोन्ही उपआयुक्तांसह सहा. उद्यान अधिकारी भालचंद्र गवळी, उद्यान अधिकारी विजय कांबळे आणि उद्यान विभागातील कर्मचारी नागरिकांसह सहभागी झाले होते. बेलापूरमध्येही डॉ. केशव बळीराम हेडगेवार उद्यान अर्थात प्रचलित मँगो गार्डनमध्येही उद्यान विभागाचे परिमंडळ १ उपआयुक्त किसनराव पलांडे तसेच बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त डॉ. अमोल पालवे, उद्यान विभागाच्या सहा.आयुक्त ऋतुजा गवळी, उद्यान अधिक्षक प्रकाश गिरी यांच्या प्रत्यक्ष सहभागातून तसेच बचत गटातील महिला व नागरिक यांच्या सहयोगातून उद्यानाची सखोल स्वच्छता करण्यात आली. ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रूग्णालयात स्वच्छता जागृती मोहीम राबविण्यात आले. यामध्ये रूग्णालय स्वच्छतेप्रमाणेच वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता याचे महत्व रूग्णाचे नातेवाईक तसेच उपस्थित नागरिकांना सांगण्यात आले. पावसाळा कालावधीत किटकजन्य आजाराचे प्रमाण रोखण्यासाठी घर व घराच्या परिसरातील डासउत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि करावयाच्या उपाययोजना याचीही माहिती नागरिकांना देण्यात आली. ऐरोली विभागाचे सहा.आयुक्त सुनिल काठोळे, रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रविंद्र म्हात्रे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांचेसह ऐरोली विभाग कार्यालय व राजमाता जिजाऊ रूग्णालय येथील कर्मचा-यांनी या मोहीमेत विशेष सहभाग घेतला.
‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानाच्या अनुषंगाने महिनाभराच्या कालावधीत स्वच्छता आणि आरोग्य विषयक नानाविध उपक्रम राबविले जात असून यामध्ये लोकसहभागावर विशेष भर दिला जात आहे.
