हवेतील धूळीचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्त्यांच्या सखोल स्वच्छतेसह ठोस उपाययोजनांवर नवी मुंबई महापालिकेचा भर
नवी मुंबई, दि. २६: नवी मुंबई शहरातील हवा गुणवत्ता चांगली रहावी यासाठी अधिक प्रभावीपणे कार्यवाही करण्याबाबत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी विभागामार्फत नियमितपणे सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात येत असून नगररचना विभागामार्फत बांधकाम साईट्सवर प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार राबविण्याकडेही प्राधान्याने लक्ष देण्यात येत आहे. याविषयी आयुक्त महोदयांनी बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारद यांचीही विशेष बैठक घेऊन त्यांना मानक कार्यप्रणालीचे काटेकोर पालन करणेविषयी सूचित केले आहे. सध्या हिवाळी कालावधीत वारा वाहण्याचे प्रमाण कमी झाले असल्याने थंडीमुळे व वायू प्रदूषणामुळे हवेतील धुरके (SMOG) वाढले असून त्याच्या नियंत्रणासाठी मुख्य रहदारीचे रस्ते व एमआयडीसी क्षेत्रातील रस्त्यांवर दोन सत्रात सखोल स्वच्छता मोहीमा राबविल्या जात आहेत. यामध्ये रस्त्यांच्या कडेला असलेली माती ब्रश तसेच मॅकेनिकल स्विपींग मशीन व फिल्पर मशीनने साफ करून उचलून नेली जात असून प्रक्रियाकृत पाण्याने रस्ते धुवून घेण्यात येत आहेत. यासाठी जेटींग स्प्रेचाही वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे एनकॅपच्या वाहनांव्दारे हवेत प्रक्रियाकृत पाण्याची कारंज्यासारखी फवारणी करून हवेतील धुळीचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जात आहे. ही एनकॅपची वाहने २४ तास कार्यरत आहेत.
मागील २ दिवसात आम्र मार्ग, ठाणे बेलापूर रोडवरील कोपरखैरणे क्षेत्र, सायन पनवेल हायवेवरील वाशी क्षेत्र, ऐरोली पटनी रोड, रबाळे एमआयडीसी क्षेत्र या मुख्य रस्त्यांप्रमाणेच सेक्टर १७ वाशी गामी साईटजवळ, सेक्टर १९ नेरूळ भाग अशा क्षेत्रांमध्ये सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या. साधारणत: ३०० हून अधिक स्वच्छताकर्मींचे गट तयार करून या मोहीमांच्या माध्यमातून रस्त्यांवरील माती उचलून ते पाण्याने धुवून घेण्यात आले. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठकीत सूचित केल्याप्रमाणे अभियंते व संबंधित यंत्रणेने क्षेत्रीय स्तरावर उतरून या कामाकडे विशेष लक्ष द्यावे अशाप्रकारे दिलेल्या निर्देशानुसार निवडणूक कामातूनही अधिकारी, कर्मचारी पर्यावरणाच्या दृष्टीने या सखोल स्वच्छतेचे बाबींचे महत्व लक्षात घेऊन अति.आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. अजय गडदे, सहा. संचालक नगररचना यांच्या नियंत्रणाखाली क्षेत्रीय पातळीवर वायू प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कृतीशील झाले आहेत.
