बांधकामाकरिता पुनर्प्रक्रियाकृत पाणी वापरासाठी नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारदांची विशेष बैठक संपन्न
नवी मुंबई, दि. १९: नवी मुंबई शहरातील बांधकाम व उदयोगांमध्ये होणारा पिण्याच्या पाण्याचा वापर टाळून सांडपाण्याचे शुध्दीकरण केलेल्या तृतीयक पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा (Tertiary Treated Water) वापर करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद व स्थापत्य कंत्राटदार यांची विशेष बैठक महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मोठया संख्येने सहभागी होत बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद व स्थापत्य कंत्राटदार यांनी महानगरपालिकेने हाती घेतलेल्या धोरणाच्या अनुषंगाने संपूर्ण सहकार्य करण्यास संमती दर्शविली.
याप्रसंगी सहा.संचालक नगररचना सोमनाथ केकाण यांनी तृतीयक पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा (Tertiary Treated Water) वापर बांधकामे व उद्योग समुहांमध्ये करण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याची बचत होईल व आपले नवी मुंबई शहर याही बाबत आघाडीवर असल्याचे दिसून येईल अशी भूमिका मांडली.
अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी महानगरपालिकेचा पाणी पुरवठा तसेच अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्रामधून शुध्दीकरण केलेल्या प्रक्रियाकृत पाण्याचा वापर याविषयी सविस्तर माहिती दिली. नवी मुंबई महानगरपालिकेची सात अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्रे असून त्यामध्ये सांडपाण्याचे शुध्दीकरण केले जाते व हे प्रक्रियाकृत पाणी उद्याने, सुशोभित जागा फुलविण्यासाठी तसेच सोसायटयांना पिण्याव्यतिरिक्त वापरण्यासाठी दिले जाते. कोपरखैरणे व ऐरोली येथे प्रत्येकी २० अशा ४० द.ल.लि. क्षमतेचे टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट असून त्यामधील तृतीयक शुध्दीकरण केलेले पुनर्प्रक्रियाकृत पाणी एमआयडीसी भागातील ५५ उद्योगांना पुरविले जात आहे व एमआयडीसी सोबत झालेल्या करारानुसार उद्योग समुहांशी संपर्क साधून त्यामध्ये वाढ केली जात आहे. एमआयडीसी क्षेत्रातील ११ आरएमसी प्लान्टलाही हे पाणी पुरविले जात आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पुनर्विकास प्रकल्प तसेच खाजगी भूखंडावरही मोठया प्रमाणत विकास कामे सुरु असून अभियांत्रिकी विभागामार्फतही स्थापत्य विकासाची कामे प्रगतीपथावर आहेत. या विकास कामांमध्ये मोठया प्रमाणावर पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो. दिवसेंदिवस पर्जन्यवृष्टीचे घटणारे प्रमाण लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू शकते. यासाठी द्वितीयक व तृतीयक शुध्दीकरण केलेल्या पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा (Tertiary Treated Water) वापर केल्यास पिण्याच्या पाण्याची मोठया प्रमाणावर बचत होईल.
ही बाब विचारात घेऊन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे मार्गदर्शनानुसार दि.१२ फेब्रुवारी २०२५ रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून तृतीयक शुध्दीकरण केलेल्या पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा (Tertiary Treated Water) वापर करण्यास प्रोत्साहित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीस उपस्थित बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद व महानगरपालिकेचे स्थापत्य कंत्राटदार यांना सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून तृतीयक शुध्दीकरण केलेल्या पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले व त्याला सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला.
