नवी मुंबईतील विविध बाजारांमधील विशेष प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांमध्ये १.६५ लाख दंडवसूली व ७१.६ किलो प्लास्टिक जप्ती
नवी मुंबई, दि. १०: प्लास्टिक पिशव्या तसेच एकल वापर प्लास्टिकमुळे पर्यावरणाची तसेच मानवी जीवनाची होणारी अपरिमीत हानी लक्षात घेऊन प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे थांबवून नागरिकांनी कापडी पिशव्यांचा पर्याय स्विकारावा याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्यापक जनजागृती केली जात आहे. त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक प्लास्टिकच्या शोध मोहीमा राबवून प्लास्टिक जप्ती व दंडात्मक कारवाई केली जात आहे. जेणेकरून एकल वापर प्लास्टिकला नागरिकांनी नाकारावे.
यादृष्टीने आज रविवारच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदीला बाहेर पडतात हे लक्षात घेत एकाच दिवशी मार्केटमध्ये प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक मोहीम राबविण्यात आली. आठही विभागांतील मार्केटमध्ये राबविण्यात आलेल्या या मोहीमांमध्ये 1 लाख 65 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली तसेच 71.6 किलो प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले.
यामध्ये बेलापूर विभागात 8 विक्रेत्यांकडे प्लास्टिक पिशव्या आढळल्याने प्लास्टिक वापरताना आढळल्याची पहिलीच वेळ असल्याने प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे एकूण 4 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली तसेच 6 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले.
नेरूळ विभागात 6 विक्रेत्यांकडून 30 हजार दंड व 10 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले. वाशी विभागात 6 विक्रेत्यांकडून 30 हजार इतकी दंडात्मक रक्कम आणि 12 कि.ग्रॅ. प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्ती करण्यात आली. तुर्भे विभागातही 2 विक्रेत्यांकडे प्लास्टिक पिशव्यांचा वापर व साठा आढळल्याने रू. 10 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 25 किलो प्लास्टिक पिशव्यांसह एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले.
कोपरखैरणे विभागातील मार्केट परिसरात राबविलेल्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक मोहीमेत 3 व्यावसायिकांकडून 15 हजार इतका दंड वसूल करण्यात आला तसेच 5 किलो एकल वापर प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला. घणसोली विभागातील मोहीमेत 4 विक्रेत्यांकडून प्रत्येकी 5 हजार प्रमाणे 20 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 9 किलो प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला. ऐरोली विभागात 2 विक्रेत्यांकडून 10 हजार दंड वसूल करतानाचा 4 किलो एकल वापर प्लास्टिकही जप्त करण्यात आले. दिघा विभागातही 2 विक्रेत्यांकडून 10 हजार दंडात्मक रक्कम वसूली करण्यात आली व 600 ग्रॅम प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.
अशाप्रकारे आठही विभाग कार्यालय क्षेत्रात राबविण्यात आलेल्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक धड मोहीमांमध्ये एकून 1.65 लक्ष दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली तसेच 71.6 किलो एकल वापर प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला. सापडलेल्या एकल वापर प्लास्टिकमध्ये प्रामुख्याने प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण सर्वाधिक होते.
या मोहीमा राबविण्यामध्ये नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली परिमंडळ 1 उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ 1 उपआयुक्त डॉ.अजय गडदे व परिमंडळ 2 उपआयुक्त श्री.संतोष वारूळे यांच्या माध्यमातून सर्व विभागांचे सहा. आयुक्त, स्वच्छता अधिकारी व अधिकारी, कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका बजावली.
यापुढील काळातही अशाप्रकारच्या प्रतिबंधात्मक प्लास्टिक वापर शोध मोहीमा नियमितपणे राबविल्या जाणार आहेत. या माध्यमातून विक्रेत्यांना समज मिळण्यासोबतच नागरिकांनीही एकल वापर प्लास्टिकचा वापर टाळावा याबाबतची अप्रत्यक्ष जागरूकता केली जात आहे.
