वाशी सागर विहार परिसरात एनएसएस विद्यार्थी व लोकसहभातून विशेष स्वच्छता मोहीम संपन्न
नवी मुंबई, दि. १३: नियमित शहर स्वच्छतेप्रमाणेच नमुंमपा घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार वर्दळीच्या जागांप्रमाणेच दुर्लक्षित जागांवरही सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यावर भर दिला जात आहे. यामध्ये व्यापक प्रमाणात लोकसहभागही लाभत आहे.
या अनुषंगाने आज सागर विहार सेक्टर ८ वाशी परिसरात विशेष सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ज्यामध्ये अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या माध्यमातून वाशी विभागाचे सहा. आयुक्त सुखदेव येडवे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे, उप मुख्य स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर, स्वच्छता अधिकारी जयश्री आढळ आणि त्यांच्या सहभागी अधिकारी, कर्मचारी यांनी स्वच्छताकर्मींसह महत्वाची भूमिका बजावली.
विशेष म्हणजे या सखोल स्वच्छता मोहीमेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, सेक्टर १६, वाशी यांचे एनएसएस विद्यार्थी पथक तसेच काही स्वच्छताप्रेमी नागरिक स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते. या मोहीमेत ३५ गोणी कचरा संकलित करण्यात येऊन तो तुर्भे येथील प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला. सागर विहार परिसरात सागरी किना-यावर आयोजित या सखोल स्वच्छता मोहीमेबद्दल परिसरातील नागरिकांकडून तसेच त्याठिकाणी भेटी देणा-या नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
