नवी मुंबई महानगरपालिका लोककल्याण मेळावा अंतर्गत फेरीवाल्यांसाठी अन्न सुरक्षा प्रशिक्षण संपन्न
नवी मुंबई, दि. ३०: पीएम स्वानिधी अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या महिलांचे अन्न सुरक्षिततेसाठी प्रशिक्षण महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्र सभागृहात संपन्न झाले. या वेळी समाजविकास विभागाच्या उपआयुक्त नयना ससाणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) प्रशिक्षक युथिका यांनी याप्रसंगी मोठया संख्येने उपस्थित महिलांशी संवाद साधत अन्न सुरक्षतते विषयी प्रशिक्षण दिले. याप्रसंगी महापालिका सचिव चित्रा बाविस्कर उपस्थित होत्या.
पीएम स्वानिधी (PM SVANidhi) योजनेंतर्गत शासनाच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) या संस्थेच्या वतीने हे प्रशिक्षण देण्यात आले. अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमास १२१ अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या महिला उपस्थित होत्या. प्राधान्याने विक्री केले जाणारे अन्नपदार्थ वडापाव, समोसा, इडली, वडा, उतप्पा, डोसा तसेच दिवाळीसाठीचे गोड व नमकीन पदार्थ, पालेभाजी, फळे आणि टिफीन अर्थात जेवणाचा डबा देणा-या महिलांचा यामध्ये समावेश होता.
या प्रशिक्षण कार्यक्रमानंतर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे (FSSAI) एक दिवसीय प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे दोन किचन ॲप्रेन, दोन कापडी पिशव्या, दोन किचन कॅप, हँडग्लोव्हज सेट, अन्नपदार्थ भेसळ ओळखण्याचे किट आणि दोन उपयुक्त पुस्तके यांचे उपस्थितांना वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे अन्नपदार्थ करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, त्याच्यासाठी आवश्यक असणारे सेफ्टी मेजर्स/सुरक्षा नियम काय आहेत, अन्न विषबाधा कशी टाळतात आणि संबंधित सर्व माहिती देण्यात आली. तसेच स्ट्रीट फूड लायसन्स काढण्याबाबतही माहिती देण्यात आली. या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे सुरक्षित अन्नपदार्थ बनविण्याची व ठेवण्याची योग्य कार्यपध्दती समजली त्याबद्दल प्रशिक्षणार्थी महिलांनी नवी मुंबई महानगरपालिका समाज विकास विभाग व भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांचे आभार मानले.
