मोहिमे अंतर्गत ३४ हजाराहून अधिक नागरिकांची तपासणी
नवी मुंबई, दि. २५: महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंबाच्या, समाजाच्या तसेच संपूर्ण देशाच्या प्रगतीसाठी केंद्रस्थानी आहे. त्या अनुषंगाने दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे अभियान केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. हे अभियान महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने साजरा करण्यात येत असलेल्या पोषण महिन्याशी संलग्न करुन राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महानगरपालिकेच्या ५ रुग्णालयांमध्ये व २६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दररोज महिला व पुरुषांची सामान्य आरोग्य तपासणी तसेच नियोजित वेळापत्रकानुसार विशिष्ट तज्ज्ञ सेवा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. १७ सप्टेंबरपासून अभियानांतर्गत एकूण २१८ शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून त्याचा लाभ १८८१५ महिला व १५९१५ पुरूष अशा एकूण ३४७३३ लाभार्थ्यांनी विविध तज्ज्ञांच्या सेवांसह घेतला आहे.

‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीबद्दल मार्गदर्शनाची विशेष सत्रे घेण्यात आली. यामध्ये मासिक पाळी सुरू होताना शारीरिक विकासामुळे होणारे बदल काय असतात तसेच मुलींना मासिक पाळी का येते, मासिक पाळी दरम्यान स्वच्छता कशी राखावी, शरीराच्या विकासासाठी घ्यावयाचा पोषक आहार, मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या त्रासावर किंवा अडचणींवर उपाय याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्याशी संवाद साधून शंकांचे निरसनही करण्यात आले. या अभियानामध्ये २२६४ किशोरवयीन शालेय मुली यांनी समुपदेशनाचा लाभ घेतला. ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियान महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यात येत असून जास्तीत जास्त महिलांनी व बालकांनी यामध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी करुन घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
