बिल वाटप मोहिमेमध्ये तब्बल २०० महिलांचा सहभाग
नवी मुंबई, दि. २८: नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ताकर विभागाने सन २०२५-२६ या विद्यमान आर्थिक वर्षामध्ये कर संकलन वाढीसाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अभिनव उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेत आत्तापर्यंत २१२ कोटींचा कर संकलित केला आहे. महानगरपालिकेने यावर्षी आजतागायत २ लाख मालमत्ताधारकांना बिलांचे घरपोच वाटप केल्याने, मालमत्ताधारकांनी कर भरण्यासाठी पुढाकार घेऊन बिलावरील ३० जूनपर्यंत असलेल्या १० टक्क्यांच्या सवलतीचा लाभ घेतला आहे
यावर्षी बचत गटांच्या महिलांद्वारे बिलांचे घरपोच वाटप, मोबाईल ॲप्लिकेशनच्या साहाय्याने मालमत्ताधारकांच्या माहितीचे संकलन व अद्ययावतीकरण (KYC), मालमत्ताकर भरण्यासाठी डिजिटल पद्धतीचा स्वीकार, मालमत्ताकराबाबत शंका निरसन व बिल मिळण्यासाठी व्हाट्सअप चॅटबॉट आणि मालमत्ताकरावर १० टक्क्यांची सवलत योजना अशा विविध प्रकारच्या अत्याधुनिक सेवा सुलभतेने उपलब्ध करून दिल्याने करदात्यांना कर भरण्यासाठी कोणतीही अडचण आलेली नाही.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तब्बल साडेतीन लाखाहून अधिक मालमत्ता असून, मालमत्ताधारकांनी कर भरून १० टक्क्यांच्या सवलतीचा लाभ घेतला आहे. शहरातील मालमत्ताधारकांना पहिल्या तिमाहीमध्येच घरपोच बिल मिळाल्याने, तसेच मालमत्ताकर भरण्यासाठी डिजिटल पद्धतीला पसंती दिल्याने करसंकलनाला गती मिळाली आहे.
बचत गटांच्या महिलांना मिळाला ‘रोजगार; मालमत्ताकर विभागाच्या पुढाकाराचा ‘दुहेरी’लाभ!
मालमत्ताकर विभागाने या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ताधारकांना बिलांचे वाटप करण्यासाठी अभिनव उपक्रम राबविला. बचत गटांच्या महिलांना मालमत्ता कराचे बिल वाटप तसेच मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे माहितीचे संकलन व अद्ययावतीकरण करण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या कामासाठी त्यांना प्रतिबिलासाठी योग्य मानधन दिल्याने महिलांना बिल वाटपातून रोजगार निर्माण होऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी विभागाने दिली. यातूनच बिलांचे शंभर टक्के वाटप शक्य झाले. त्याचबरोबर, या अभिनव उपक्रमामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी फक्त ३० दिवसांतच निम्म्याहून अधिक मालमत्तांपर्यंत बिले पोहोचल्याने, कमी कालावधीत तब्बल २१२ कोटींचा कर संकलित करण्यात आला आहे.
