पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा सर्वच विभागांत युध्दपातळीवर कार्यरत
नवी मुंबई, दि. ३०: नवी मुंबईत मुसळधार पावसानंतर जनजीवन सुरळीत होण्यावर प्राधान्याने भर देतानाच सर्व विभाग प्रमुख, विभाग अधिकारी तसेच कार्यकारी अभियंता यांची बैठक घेऊन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्वांनी महापालिका क्षेत्रात फिरुन पावसाळयामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी व आवश्यक सर्व कार्यवाही तातडीने करावी असे स्पष्ट निर्देश दिले होते.
त्या अनुषंगाने सर्व विभाग कार्यालय क्षेत्रात युध्द पातळीवर कामाला सुरुवात झाली असून अंतर्गत नाले व मोठे नाले सफाई तसेच गटारे व मलनि:स्सारण वाहिन्यांची सफाई करण्याकडे तसेच त्यामधून निघणारा गाळ सुकण्यासाठी काठावर न ठेवता लगेच उचलून नेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गाळ वाहून नेताना रस्त्यावर सांडत असल्यास जेटींग मशिनचा वापर करुन रस्ते स्वच्छ करण्याची कार्यवाही देखील करण्यात येत आहे. याकरिता मलप्रक्रिया केंद्रातील शुध्द केलेले प्रक्रीयाकृत पाणी वापरण्याची दक्षता घेतली जात आहे. वाहतूकीला अडथळे येत असलेल्या झाडांच्या फांदयांची योग्य प्रमाणात छाटणी करण्यात येत असून त्याचा हरित कचरा उदयान व घनकचरा व्यवस्थापन या दोन्ही विभागांचा परस्पर समन्वय राखून उचलून नेला जात आहे.
पाणीपुरवठा, मलनि:स्सारण व इतर कामांमुळे रस्त्यांवर झालेले खड्डे मातीने बुजविण्यात आलेले असल्याने त्याचे तातडीने पुनर्पृष्ठीकरण करणेची कार्यवाही करण्यात येत आहे. त्याकरिता डब्ल्यूबीएम पदध्तीचा वापर करण्यात येत आहे. यासोबतच रस्त्यांवर व मोकळया जागी ठिकठिकाणी पडलेले डेब्रिज उचलून नेण्याची कार्यवाही देखील हाती घेण्यात आली असून परिसर स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे. एमआयडीसी क्षेत्रातही ही सर्व कार्यवाही करण्याकडे लक्ष देण्यात येत आहे. आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार आठही विभाग कार्यालय क्षेत्रात महानगरपालिकेची पथके युध्द पातळीवर कामाला लागलेली असून यावर संबंधित विभागांचे नोडल अधिकारी असणारे विभागप्रमुख बारकाईने लक्ष देत आहेत.
तरी नागरिकांनी पावसाळा कालावधीत कोणत्याही प्रकारच्या अडचणीसाठी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील मध्यवर्ती आपत्ती नियंत्रण कक्षाशी 022-27567060/022-227567061 या दूरध्वनी क्रमांकावर तसेच 1800222309/1800222310 या टोल फ्री क्रमांकावर अथवा संबंधित विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
