नवी मुंबईत शाळांमधून ‘स्वीप’ उपक्रमांव्दारे विद्यार्थ्यांच्या पालक, नातेवाईकांना मतदानाचे आवाहन
नवी मुंबई, दि. १२: नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत शाळांमध्ये रांगोळी, निबंध, चित्रकला, वक्तृत्व, हस्तकला, संकल्पपत्रे, पालकांना मतदानाची भावनिक साद घालणारे पोस्टकार्ड लिखाण अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांव्दारे मतदानाचे महत्व विद्यार्थ्यांमार्फत त्यांचे पालक, कुटूंबिय, शेजारी, परिचित व्यक्ती यांना पटवून दिले जात असून लोकशाहीचा उत्सव जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, निवडणूक उपायुक्त भागवत डोईफोडे, स्वीप कार्यक्रम नोडल अधिकारी डॉ. अजय गडदे, शिक्षण उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम यशस्वीपणे राबविली जात आहे.
अशाच प्रकारचा मतदान जनजागृती उपक्रम कोपरखैरणे येथील ज्ञानविकास संस्थेच्या डिव्हीएस कॉलेज ऑफ कॉमर्स या ठिकाणी राबविण्यात आला. तेथे ९३१ विद्यार्थी व पालकांनी एकत्र येत सामुहिक मतदार प्रतिज्ञा घेतली व बहुसदस्यीय पॅनल पध्दतीमध्ये मतदान कसे करावे या विषयी माहिती करुन घेतली. एनएसएस युनीट विद्यार्थ्यांचा या मतदान जागरुकता उपक्रमात सक्रीय सहभाग होता. कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयातील १००० हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत परिसरात मतदान जनजागृती रॅली काढून ‘मतदान करा – लोकशाहीचा सन्मान करा’ अशा विविध जोरदार घोषणा देत, फलक उंचावत मतदान करण्याचे आवाहन केले. एफ.जी.नाईक महाविद्यालयातील युवा विद्यार्थ्यांनीही स्वतंत्र रॅली काढून मतदान जनजागृतीचा कोपरखैरणे विभागात यशस्वी उपक्रम केला.
कोपरखैरणे येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. १०६ मध्ये मतदान जनजागृतीपर रांगोळी व वक्तृत्व स्पर्धत विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी होत मतदानाचे महत्व रंगांच्या व शब्दांच्या माध्यमातून पटवून दिले. ७५० हून अधिक विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती रॅलीत सहभागी होऊन मतदान करा असा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
शाळा क्र. ३८ से. २ कोपरखैरणे येथे मतदान प्रक्रिया कशी असते याची माहिती विद्यार्थ्यांना होण्याकरिता अभिरुप मतदान केंद्र उभारुन मतदान प्रक्रियेची माहिती कल्पक उपक्रम राबवित विद्यार्थ्यांना करुन दिली. शाळा क्र. १२२ कोपरखैरणे शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत मतदान जनजागृती विषयी मनोरंजन व प्रबोधन करणारे पथनाटय तयार करुन ते से. १५ कोपरखैरणे व इतर भागांमध्ये सादर केले.
दिव्यांग विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणा-या सहयोगिणी अपंग पालक संस्था यांनीही पुढाकार घेत विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना मतदानाचे महत्व पटवून देऊन १५ जानेवारीला मतदान करण्याचे आवाहन केले.
लोकशाहीचा जागर करीत ७०० विद्यार्थी व ५०० पालकांनी एकत्र येत केला घणसोलीत केला मतदानाचा जागर
रविवारी सुट्टीच्या दिवशी शालेय परिवर्तन स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पीएम श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, रबाळे येथे जमलेल्या पहिली ते आठवीतील ७०० हून अधिक विद्यार्थी आणि ५०० हून अधिक पालकांनी एकत्र येत १५ जानेवारी रोजी होणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत सर्वांनी मतदान करावे यादृष्टीने ‘मतदान जागरुक दूत’ बनून काम करण्याची प्रतिज्ञा घेतली. विद्यार्थ्यांनी स्वहस्ते आपल्या पालकांच्या छातीवर ‘जागरूक मतदार’असे बिल्ले लावले व “आम्ही जागरूक झालो आहोत, आता तुम्हीही व्हा” असे भावनिक आवाहन केले.
पालकांनी केवळ स्वतः मतदान करावे एवढ्यावरच न थांबता, प्रत्येक पालकाने आपल्या परिसरातील, नातेवाईकांमधील किमान १० जणांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे असे उद्दिष्ट ठरविण्यात आले. “आमची मुले गेल्या काही दिवसांपासून घरात मतदानाचे महत्त्व सांगत आहेत. आज त्यांच्या हाताने मतदार बिल्ला लावून घेताना खूप अभिमान वाटला. आम्ही स्वतः तर मतदान करणारच, पण इतरांनाही सोबत नेऊ” अशी उत्स्फुर्त प्रतिक्रिया पालकांनी याप्रसंगी दिली. हा विशेष कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल विशे, परीक्षाप्रमुख अविनाश जाधव, सनी पाटील, दिनेश भोये व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण घणसोली विभागात राबविल्या जात असलेल्या स्वीप मोहीमेचे सुयोग्य नियोजन निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना गोडे, सुचित्रा पाटील, वसंत मुंडावरे, यशवंत कापसे आणि स्वीप प्रमुख संतोष मोरस्कर, समन्वय अधिकारी कमलेश इंगळे करीत आहेत.
