संविधान दिनानिमित्त ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात प्रश्नमंजुषा
नवी मुंबई, दि. २६: संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली येथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे समूहवाचन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचा प्रारंभ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व संविधान पुस्तिका यांना शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. उपस्थित मान्यवर अतिथींचे स्वागत स्मारकाच्या सल्लागार संध्या अंबादे यांनी केले. या प्रसंगी सुजाता बहुउद्देशीय संस्था, नवी मुंबई यांच्या अध्यक्षा शशिकला जाधव तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी आपल्या मनोगतात संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. उपस्थित विद्यार्थी, शिक्षकवर्ग व स्थानिक नागरिकांनी सामुहिकरित्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून संविधान मूल्यांचे स्मरण केले. या कार्यक्रमात नमुंमपा माध्यमिक विद्यालय, शाळा क्रमांक १०३, ऐरोली येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संविधान दिनाचे औचित्य साधून प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये साहिल नागेश शिंदे, रवीना राजाराम थोरात, ऐश्वर्या लिंगाप्पा पुजारी, अभिषेक दत्ता काटवडे, भक्ती दीपक पवार, स्नेहा पंकज सोनकांबळे, स्नेहल सचिन पवार, अथर्व अजय पवार, वेदांत वीरेंद्र सोनवणे, रोहित विनोद राठोड या नमुंमपा माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक १०३, ऐरोली येथील विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावले. विजेत्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तके भेट म्हणून प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक प्रदीप मस्तुद यांनी केले.
