Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 9372236332 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 9372236332

स्वीप कार्यक्रमांतर्गत महानगर पालिकेतर्फे नवी मुंबईत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती

सामुहिक मतदार प्रतिज्ञा घेत नवी मुंबईतील नागरिकांनी केला मतदानाचा निर्धार

नवी मुंबई, दि. १०: २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये “आम्ही मतदान करणार” असा निर्धार करीत “तुम्हीही मतदान करा” असे आवाहन नवी मुंबईत ठिकठिकाणी स्वीप कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेल्या उपक्रमांमध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने केले. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता १५० ऐरोली आणि १५१ बेलापूर या दोन्ही विधानसभा निवडणूक कार्यालयांमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकाही स्वीप कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या माध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.
याचाच एक भाग म्हणून निवडणूक आयोगामार्फत ८ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत स्वीप कार्यक्रमांतर्गत विशेष उपक्रम राबविण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, स्वीपचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक दिवशी राबवावयाच्या उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत ८ नोव्हेंबर रोजी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापालिका आयुक्तांसमवेत सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी एकत्रितपणे सामूहिक मतदार प्रतिज्ञा ग्रहण केली.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या ८ विभाग कार्यालयांमध्ये तेथील सहाय्यक आयुक्त यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित नागरिकांसह मतदार प्रतिज्ञा घेतली. त्याचप्रमाणे आठही विभाग कार्यालय क्षेत्रात विविध ठिकाणी नागरिकांना एकत्र करून त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले आणि त्यांच्यासह मतदार प्रतिज्ञा सामूहिकरित्या घेण्यात आली.
याशिवाय १५० ऐरोली विधानसभा निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाने आणि १५१ बेलापूर विधानसभा मतदार निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पाटील यांनी निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत मतदान प्रतिज्ञा घेतली. ९ नोव्हेंबर रोजी १५० ऐरोली विधानसभेच्या स्वीप नोडल अधिकारी उपायुक्त अभिलाषा म्हात्रे आणि १५१ बेलापूर विधानसभा स्वीप नोडल अधिकारी सहा. आयुक्त सागर मोरे यांच्या माध्यमातून महानगरपालिका क्षेत्रात शासकीय कार्यालये, नाट्यगृह, मॉल, रेल्वे स्टेशन, उद्याने, पर्यटन स्थळे अशा नागरिकांची वर्दळ असणाऱ्या विविध ठिकाणी रांगोळी काढून त्यातून मतदान करण्याचा संदेश प्रसारित करण्यात आला. अशाच प्रकारे या पुढील काळात विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविला जाणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *