नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
नवी मुंबई, दि. ७: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्या ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करतील. येत्या डिसेंबर पासून या विमानतळावरुन उड्डाणांना सुरुवात होईल. मुंबई महानगरप्रदेशातले हे दुसरे विमानतळ असून यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरचा भार कमी होणार आहे. या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता ९ कोटी असेल.
आपल्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी मुंबई मेट्रो-३ चं लोकार्पण करणार आहेत. शहराच्या वाहतूक व्यवस्थेतला हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. त्यानंतर प्रधानमंत्री, ‘मुंबई वन’, या भारताच्या पहिल्या एकात्मिक मोबिलिटी ॲपचं उद्घाटन करणार आहेत. तसंच प्रधानमंत्री अल्पकालीन रोजगारक्षम उपक्रमाचं उद्घाटन करतील. हा उपक्रम राज्यातली चारशे तंत्रनिकेतन महाविद्यालयं तसंच दीडशे शासकीय तांत्रिक उच्च विद्यालयांमधे राबवला जाईल. तरुणांमधे रोजगारक्षमता वाढवण्यासाठी कौशल्यविकास करणं हा याचा हेतू आहे.
Source – AIR
