जनतेने आघाडीला विरोधी बाकावर बसण्याची सुसंधी दिली आहे : शरद पवार
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील यशवंराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत देश व राज्य पातळीवरील विविध प्रश्नांचा परामर्श घेतला. “काल दिल्लीत युनिफॉर्ममधील पोलिसाला मारहाण झाली. पोलिसांवरील हल्ल्यांची संख्या ज्या पद्धतीने वाढत आहे त्यामुळे देशातील पोलिसांचे खच्चीकरण होते आहे. कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या व्यक्तींचे अशा रीतीने मनोबल खच्ची झाले तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. दिल्ली पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी दिल्लीच्या जनतेने भूमिका घेतली हे स्वागतार्ह आहे.” असे म्हणत त्यांनी गेले काही दिवस दिल्लीत चालू असलेल्या पोलीस आणि वकील यांच्यामधील वादावरील नाट्यावर भाष्य केले. पुढे ते म्हणाले की, “दिल्लीत जो प्रकार घडला त्याची गंभीर नोंद घेण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकारने यात तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे.”
या महिन्यात रामजन्मभूमी खटल्याचा सर्वोच्च न्यायालयात निकाल लागणार असून या बाबत आपलं मत मांडताना शरद पवार म्हणाले की, “लवकरच सर्वोच्च न्यायालयाचा अयोध्येचा निकाल येणार आहे. निकाल लागल्यानंतर समाजातील कोणत्याही घटकाने हा निकाल आपल्या विरोधी लागला आहे, असा विचार करू नये. न्यायालयीन निर्णय लागल्यावर तो सामंजस्याने स्वीकारण्याची गरज आहेनिकाल काहीही लागला तरी कोणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाला मदत करावी. जी परिस्थिती १९९२ साली उद्भवली त्याची पुनरावृत्ती होऊ नये, असे आवाहन मी करतो.”
यानंतर शिवसेना-भाजप मधील सत्ता संघर्षावर भाष्य करताना ते म्हणाले की, “भाजपा-शिवसेना या दोघांना महाराष्ट्राच्या जनतेने सत्तास्थापनेसाठी कौल दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर सरकार बनवावे. जनतेने आघाडीला विरोधी बाकावर बसण्याची सुसंधी दिली आहे, त्यामुळे ते काम समर्थपणे पार पाडण्याची आमची भूमिका आहे.”
अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकावर बसण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
