राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी अशोक गावडे यांची निवड
नवी मुंबई: गेल्या आठवड्यात नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ऐरोली विधानसभा क्षेत्रातील आमदार संदीप नाईक व नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर जयवंत सुतार यांच्यासह ५२ नगरसेवकांनी भाजपची वाट धरली. गेले १९ वर्ष नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा म्हणून गणेश नाईक यांनी पक्षाचं अस्तित्व राखलं आणि वाढवलंही. नाईक परिवाराची एकहाती सत्ता असल्यामुळे शरद पवार निर्धास्त होते. पण नेत्यांनी केलेल्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीची पूर्णपणे वाताहत झाली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबई पाठोपाठ नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी नव्या शिलेदाराची निवड केली आहे. अशोक गावडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्ष बळकटीसाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी अशोक गावडे काम करतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.