Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 9372236332 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 9372236332

‘एचएसएनसी’ समूह विद्यापीठाचा दुसरा पदवीप्रदान समारंभ मुंबईतील के.सी. महाविद्यालय सभागृहात संपन्न

“विद्यार्थ्यांनी उद्योजक बनून विकसित भारत निर्माण प्रक्रियेत योगदान द्यावे” – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. १२ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करत असताना आपण राजभाषा आणि मातृभाषेचा प्रचार – प्रसार करावयास हवा. इतर देशातील नागरिक त्यांच्या देशाची भाषा अभिमानाने बोलतात त्याचप्रमाणे आपणही आपल्या भाषांचा जास्तीत जास्त वापर करावयास हवा. सन २०४७ पर्यंत भारताला विकसित भारत करण्याचे उद्द‍िष्ट असून, पदवीधारक विद्यार्थ्यांनी नवोन्मेषी उद्योजक बनून विकसित भारत निर्माण करण्याच्या प्रक्रियेत योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

‘एचएसएनसी’ समूह विद्यापीठाचा दुसरा वार्षिक दीक्षान्त समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या के.सी. महाविद्यालय सभागृहात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. दीक्षांत समारंभात ३२ स्नातकांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

राज्यपाल बैस म्हणाले की, हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट मंडळाचा इतिहास धैर्यवान व्यक्ती आणि त्यांच्या दृढ संकल्पावर आधारित आहे. देशाच्या फाळणीनंतर सिंध प्रांतातील लोक भारतात आले. त्यापैकी काही प्राध्यापक – शिक्षकांनी इतर शिक्षकांना रोजगार  मिळावा तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी शैक्षणिक संस्था सुरू केल्या. आज या संस्था शिक्षण आणि सेवा क्षेत्रात उत्तम कार्य करीत आहेत.

विद्यार्थ्यांनी उद्योजक बनून विकसित भारत निर्माण प्रक्रियेत योगदान द्यावे – राज्यपाल रमेश बैस             

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर तयार करण्यात आले आहे. हे धोरण २१ व्या शतकातील शिक्षणाच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांसह शिक्षण व्यवस्थेच्या नियमन आणि प्रशासनासह सर्व पैलूंमध्ये सुधारणा आणि पुनर्रचना करण्यासाठी असल्याचे सांगून ‘एचएसएनसी’ विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करुन इतर विद्यापीठांसाठी मापदंड प्रस्थापित करावे असे आवाहन राज्यपाल बैस यांनी केले.  विद्यापीठाने आपल्या माजी विद्यार्थ्यांना देखील विद्यापीठ विकास व विस्तार कार्याशी जोडण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

आत्मनिर्भर राष्ट्र बनविण्यासाठी भाषेबाबत देखील आत्मनिर्भर झाले पाहिजे असे सांगून युवकांनी मातृभाषेचा आणि राष्ट्रभाषेचा जास्तीत जास्त वापर करावयास हवा, असे राज्यपालांनी सांगितले. मात्र त्यासोबतच  ज्ञान वाढवण्यासाठी इंग्रजीसह इतर देशांच्या भाषा देखील शिकाव्या असेही त्यांनी आवर्जून सांगितले. प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठता आणि नैतिकता या मूल्यांमुळे भारत विश्व गुरू बनला असून, विद्यार्थ्यांनीही ही मूल्ये जोपासत आपल्या क्षेत्रात देशसेवा करावी असे राज्यपालांनी सांगितले.

कार्यक्रमाला ‘एचएसएनसी’ समूह विद्यापीठाचे प्रमुख डॉ. निरंजन हिरानंदानी, ‘एचएसएनसी’ मंडळाचे अध्यक्ष अनिल हरीश, सचिव दिनेश पंजवानी, विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. हेमलता बागला, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. जयेश जोगळेकर, मंडळाचे माजी अध्यक्ष किशु मनसुखानी, कुलसचिव भगवान बालानी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिष्ठाता, प्राध्यापक, स्नातक आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *