“विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीने शिक्षण घेतानाच मैदानी खेळांनाही प्राधान्य द्यावे” – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई, दि. १५ : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘शाळा प्रवेशोत्सवा’त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच संस्कार, क्रीडा, योग आणि संगीत यांचे महत्त्व पटवून दिले. शाळा ही केवळ ज्ञानदान करणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे, मूल्यसंवर्धनाचे आणि उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे केंद्र असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
भायखळा येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, अतिरिक्त आयुक्त (शिक्षण) डॉ. अविनाश ढाकणे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यपालांनी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रथमच शाळेत दाखल झालेल्या बालकांचे विशेष स्वागत केले. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून जिज्ञासू वृत्ती विकसित करावी, अधिकाधिक प्रश्न विचारावेत आणि ज्ञान मिळविण्याची आवड जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षणासोबतच चांगले संस्कार, सामाजिक मूल्ये आणि विविध कौशल्ये आत्मसात करणे आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, आजची विद्यार्थी पिढी ही उद्याच्या भारताची दिशा ठरविणारी शक्ती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेच्या पूर्ततेत विद्यार्थ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता त्यांचा सर्वांगीण विकास घडविणे आवश्यक आहे.
शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने योग, संगीत आणि मैदानी खेळांचे महत्त्व अधोरेखित करताना राज्यपालांनी विद्यार्थ्यांना मोबाईल फोनवरील अवाजवी अवलंबित्व कमी करण्याचा सल्ला दिला. अधिकाधिक मित्र जोडावेत, एकत्र खेळावे, संवाद साधावा आणि संघभावना विकसित करावी, असे ते म्हणाले. खेळांमुळे आत्मविश्वास वाढतो, नेतृत्वगुण विकसित होतात आणि निरोगी शरीरासोबत निरोगी मनाचीही जडणघडण होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
संगीत आणि योग शिक्षणाबाबत बोलताना राज्यपालांनी सांगितले की, संगीतामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, संवेदनशीलता आणि भावनिक संतुलन विकसित होते, तर योगामुळे शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होते. त्यामुळे शाळांमध्ये या विषयांना अधिक प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धात्मक जगासाठी तयार करताना कौशल्य विकास, क्रीडा, बहुभाषिक शिक्षण आणि डिजिटल साक्षरतेवर विशेष भर देणे गरजेचे असल्याचेही राज्यपालांनी सांगितले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर आणि सक्षम बनविणारे शिक्षण देणे ही शिक्षण व्यवस्थेची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यपालांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक केले. शिक्षक, कर्मचारी आणि शाळा प्रशासन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पालकांनीही मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घेत त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी यावेळी महानगरपालिका शाळांमध्ये सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा, दर्जेदार शिक्षण आणि आनंददायी शिक्षण प्रक्रिया उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य मंडळासोबतच विविध राष्ट्रीय अभ्यासक्रमांनुसार शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान राज्यपालांनी शाळेतील विविध विभागांची पाहणी केली. त्यांनी खगोलशास्त्र प्रयोगशाळा, पूर्वप्राथमिक वर्ग, संगणक प्रयोगशाळा, स्मार्ट वर्गखोल्या तसेच मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्रयोगशाळेचे अवलोकन केले. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि मध्यान्ह भोजनाचे प्रतीकात्मक वाटप करण्यात आले.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित या प्रवेशोत्सवातून विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार, आरोग्य आणि कौशल्य विकासाचा संदेश देत सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला. विकसित आणि सक्षम भारत घडविण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणासोबतच योग्य दिशा देणे आवश्यक असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
