मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात नवी मुंबई महापालिकेत उजळल्या जयवंत दळवींच्या साहित्य ‘स्मरणखुणा’
नवी मुंबई, दि. २६: मानसशास्त्राचे अभ्यासक असलेल्या साहित्यिक जयवंत दळवी यांच्या कथा, कादंब-या, नाटके अशा विविध स्वरूपाच्या साहित्यकृतींतून माणसाच्या अंतर्मनात चाललेल्या वरवर न दिसणा-या भावभावनांचे स्तिमित करणारे दर्शन घडते, त्यामुळे आपल्याला माणूस म्हणून समृध्द करणा-या दळवींची पुस्तके आवर्जून वाचायला हवीत, त्यांना समजून घ्यायला हवे असे मत व्यक्त करीत लेखिका, व्याख्यात्या डॉ.निर्मोही फडके यांनी दृश्यात्मक लेखन हे दळवींचे लेखन वैशिष्ट्य असल्याचे सांगितले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. यंदाचे वर्ष सुप्रसिध्द मराठी साहित्यिक जयवंत दळवी यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांच्या साहित्यसंपदेवर प्रकाशझोत टाकणारा ‘स्मरणखुणा : जयवंत दळवी’ हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला.
लेखिका डॉ. निर्मोही फडके यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी जयवंत दळवी यांच्या साहित्यकृतींवर विवेचनात्मक भाष्य केले. तसेच योगेश केळकर व वंदना गुजरे यांनी दळवींच्या कथांचे अप्रतिम अभिवाचन करीत दळवीच्या साहित्यकृतींचे बलस्थान अधोरेखित केले. गढुळलेल्या मनाचा निचरा करण्यासाठी लेखन हा मार्ग निवडल्याचे दळवी म्हणत. त्यांना गर्दीतला एकांत आवडत असे. ते काळाच्या पुढचे पाहणारे द्रष्टे लेखक होते असे सांगतानाच डॉ. निर्मोही फडके यांनी दळवींनी लग्नसंस्थेवर केलेले भाष्य, ठणठणपाळ नाव धारण करीत विनोदी पध्दतीने उडविलेली उपहासात्मक खिल्ली असे त्यांच्या लेखनाचे विविध पैलू उदाहरणे देत उलगडवून सांगितले.
वंदना गुजरे यांनी अभिवाचनातून सादर केलेली मनोवेधी कथा ऐकताना रसिक गुंगून गेले तसेच योगेश केळकर हे बहारदार रितीने कथा सादरीकरण करताना हास्याचे धुमारे फुटले. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीची आठवण ठेवून आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमामुळे स्वच्छतेप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिका सर्वच बाबतीत आपले वेगळेपण टिकवून ठेवत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी शासनाच्या मराठी भाषा संचालनालयाचे विभागीय भाषा संचालक योगेश शेट्ये यांनीही आवर्जून उपस्थित रहात उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, भांडार विभागाचे उपआयुक्त शंकर खाडे, शिक्षणाधिकारी अरूणा यादव, विधी अधिकारी अभय जाधव व इतर अधिकारी, कर्मचारी व रसिक नागरिक उपस्थित होते. पंधरवड्यातील यापुढील कार्यक्रम मंगळवार दि. २८ जानेवारी रोजी संपन्न होत असून मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘अभिजात मराठीची पुढील वाटचाल’ या विषयावर नमुंमपा अधिकारी – कर्मचारी यांचेकरिता ‘वक्तृत्व स्पर्धा’ सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा संपन्न झाल्यानंतर सायं. ४ वा. पंधरवडा कालावधीत यापूर्वी झालेल्या स्वकवितावाचन, अभिवाचन या दोन्ही स्पर्धांसह वक्तृत्व स्पर्धेचाही पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
