खासदार धनंजय महाडीक यांच्या अडचणींत वाढ; प्रचारसभेत आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
कोल्हापूर, दि. ११: कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भाजपाचे खासदार धनंजय महाडीक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी प्रचार सभेत भाषण करताना धनंजय महाडिक यांनी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांबाबत दटावणीच्या भाषेत विधान केले होते. विरोधीपक्षांकडून टीका सुरु झाल्यावर २४ तासांच्या आत महाडिक यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग वर पोस्ट करत जाहीर माफी मागितली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून आचारसंहिता १५ ऑक्टोबर, २०२४ पासून लागू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप फुलेवाडी ता. करवीर येथील राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता – २०२३ चे कलम १७९ अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतचा खुलासा तात्काळ सादर करण्यात यावा अशी नोटीस त्याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण यांनी धनंजय महडिक यांना देण्यात आली होती. याबाबत धनंजय महडिक यांनी खुलासा सादर केला. याबाबत सादर केलेला खुलासा अमान्य करीत खासदार महडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी भरारी पथकातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यानुसार भारतीय न्याय संहिता बी एन एन एस २०२३ अंतर्गत १७१ (२) (a) अंतर्गत दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.२३ वा जुना राजवाडा कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
