शिवसेना नेते संजय राऊत यांचा हल्लाबोल
मुंबई, दि. १५: महाराष्ट्रात आज २९ महापालिका निवडणुकांसाठी मतदान सुरू असून, विविध ठिकाणांहून आचारसंहिता भंगाच्या घटना समोर येत आहेत. अशाच एका प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी थेट निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण–डोंबिवलीत मतदानाचा हक्क बजावताना शर्टवर भाजपचे निवडणूक चिन्ह असलेले कमळ लावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
“निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय?”
संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,
“निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्रन लुंगीवाले छातीवर कमळ लावून मतदानास गेले. हा आचारसंहितेचा भंग आहे. यांच्यावर काय कारवाई होणार?”
मतदानावेळी राजकीय पक्षाचे चिन्ह परिधान करणे हा आचारसंहितेचा थेट भंग असल्याचा आरोप करत राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
“ठेचून काढण्याची भाषा करता, मग कारवाई करणार का?”
संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की,
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठेचून काढण्याची भाषा करतात. मग या आचारसंहिता भंग करणाऱ्यांना ठेचून काढणार का?”
एकीकडे सत्ताधारी नेते कठोर कारवाईची भाषा करत असताना, प्रत्यक्षात भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर कोणती कारवाई होते का, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.
निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा निशाणा
संजय राऊत यांनी स्पष्टपणे म्हटले की, आचारसंहिता भंग करणाऱ्या कृतींवर जर कारवाई होत नसेल, तर निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद ठरते. त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली.
राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण
दरम्यान, या प्रकरणावर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि नियमभंग आढळल्यास आवश्यक ती कारवाई केली जाईल.
