“पनवेलमधील लोकप्रतिनिधींना जराही लाज वाटत नाही” – एक पनवेलकर
पनवेल, दि. १४: राज्यातील इतर महानगरपालिकांप्रमाणेच पनवेल महापालिकेसाठी उद्या दि. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. साधारणपणे सत्ताधारी आणि विरोधीपक्ष अशा दोघांनी मागील १०-१२ दिवसांत आपापल्यापरीने प्रचार केला आहे. त्यांनी पालिकेची सत्ता ताब्यात आल्यावर आपण काय करू हे जाहीरनामा किंवा वाचनाम्याच्या माध्यमांतून नागरिकांसमोर मांडलंय. हि झाली एक बाजू. पण, सामान्य पनवेलकरांच्या मनात काय आहे हे या सर्वपक्षीय उमेदवारांनी जाणलंय का हा मोठा सवाल आहे. पनवेल महानगरपालिकेचं मुख्यालय ज्या भागात आहे तेथील समस्या या वर्षानुवर्षे तशाच आहेत. त्यात काही विशेष बदल झाल्याचे पाहायला मिळत नाही. शिवाय, यंदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडणुकांच्या नावाखाली पैशांच्या जोरावर झालेली लोकशाहीची थट्टा सबंध राज्याने पाहिली. या पार्श्वभूमीवर इथे राहणाऱ्या सामान्य नागरिकाची व्यथा मांडण्याचा प्रयत्न ‘प्रश्न पनवेलचे’ या फेसबुक ग्रुपचे एडमिन चेतन जोशी यांनी केला आहे. या फेसबूक ग्रुपच्या माध्यमातून पनवेलमधील समस्यांबाबत परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पत्रकार वेळोवेळी चर्चा करत असतात. पनवेलची सध्याची राजकीय स्थिती व शहराची बिघडलेली घडी चेतन जोशी यांना व्यथित करते आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. जाणून घ्या चेतन जोशी यांचं नेमकं काय म्हणणं आहे.
पनवेलमध्ये सिमेंट रस्त्यावर खड्डे पडले आहेत त्यांची चिंता पालिकेला नाही. नवे सिमेंट रस्ते असे बांधले आहेत की तिथे ट्राफिक जाम होते. आधीचा मोठा रस्ता जाऊन सिमेंटचा छोटुकला रस्ता झाल्यामुळे ट्रॅफिकची पूर्ण बोंब झालेली आहे. त्या रस्त्यांवरील फुटपाथ तर मोठ्ठा विनोद आहे. तो विनोद का आहे ? हे जाणून घ्यायचं असेल तर साईनगर रोडवरील खारलँडला लागून असलेला फुटपाथ पहा. नियोजनशून्य, निरुपयोगी असे हे रस्ते … काय बोलणार ? असो …
कचरा उचलायला मोठ्ठा ट्रक एवढूश्या गल्लीत घुसून ट्राफिक जाम करतो याची अक्कल एकाला नाही.ध्वनी प्रदूषण तर पनवेलमध्ये कायदेशीर आहे. अगदी पोलिसही त्याला परवानगी देतात (माझ्याकडे पुरावा आहे). खुद्द पोलिसांना ध्वनी प्रदूषण कायदा माहीत नाही अशी परिस्थिती आहे. एकंदरीत पनवेलमध्ये तुम्हाला जर ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत असेल तर तो सहन करणे हाच एक उपाय आहे.पार्किंग समस्या ही नो पार्किंग एवढा बोर्ड लावला की संपते ही अंधश्रद्धा शासन आणि प्रशासनात आहे. या पलीकडे काय करता येईल याची अक्कल त्यांना नाही. उंदराच्या शेपटीएवढ्या रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर असेल तर ऑड इव्हन पार्किंगचा उपयोग नक्की काय हे अजूनही समजत नाही.ट्राफिक कंट्रोल, वाहतूक व्यवस्था म्हणजे केवळ विना हेल्मेटवाले पकडणे हे शिक्षण वाहतूक पोलिसांना ज्या राज्यात मिळते तिथे आपण फार वाहतूक कायदे न पाळलेले बरे असेच वाटते. सिग्नल तोडणाऱ्यांवर कारवाई करणासाठीची मानसिकता कुठेही दिसत नाही ना ततसंबंधी उपाययोजना शहरात दिसत आहेत.अनधिकृत बॅनर तर पनवेल शहराला आणखीनच बकाल करतात पण पालिका ढिम्म असते. खुद्द महापौर, उपमहापौर यांचे अनधिकृत बॅनर लागतात. अनधिकृतपणे रस्ता अडवून सण साजरे करताना पनवेलमधील लोकप्रतिनिधींना जराही लाज वाटत नाही. अर्थात त्यांच्या आजूबाजूला निर्लज्ज कार्यकर्ते खच्चून भरलेले असताना त्यांना ती लाज वाटावी अशी अपेक्षा करणेही चुकीचेच आहे. ना पालिकेला हे अडवलेले रस्ते दिसत ना पोलीस प्रशासनाला. असो …महानगर पालिका म्हणून पालिकेला मिळालेला कर आणि राज्य सरकार कडून मिळणारे फंड जातात कुठे हे एक कोडंच आहे. त्याचं उत्तर माहीत असलं तरी ते कोडंच आहे. हे ही असो … हे फंड आम्हा मध्यमवर्गीयांना सोयी सुविधांमधून दिसत नाहीत.हे सगळं एक मतदार, एक नागरिक म्हणून मला मान्य नाही पण विरोधी पक्ष तरी काय वेगळा आहे. वरील अनेक समस्या निर्माण करण्यात त्याचाही तितकाच हातभार आहे.
आपण पनवेलकर एका विचित्र चक्रात सापडलो आहोत. मला तरी सध्या ‘नोटा’ हाच पर्याय योग्य वाटतो. अर्थात पुढेही यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा संविधानिकच असो हीच अपेक्षा. पण शासन आणि प्रशासन गुंड, छपरी लोकांना डोक्यावर घेऊन नागरिकांना पायदळी तुडवत असेल तर एकंदरीत भविष्य कठीण आहे.– चेतन जोशी
(सौ. चेतन जोशी/फेसबुक)
