बाधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद, उद्योजक, व्यापारी यांच्याशी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी साधला संवाद
नवी मुंबई, दि. २२: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उद्योग व व्यवसायास चालना देण्यासाठी उद्योजक व व्यावसायिक यांच्या अडचणी जाणून घेण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने महापालिका मुख्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आयुक्तांनी उपस्थित उद्योजक व व्यावसायिक यांच्याशी संवाद साधत त्यांना प्रशासकीय पातळीवर जाणवणा-या अडचणी जाणून घेतल्या व त्यामधील तातडीने करावयाच्या बाबींवर पूर्तता करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले. याप्रसंगी महापालिकेचे शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, सहा. संचालक नगररचना सोमनाथ केकाण उपस्थित होते.
या बैठकीमध्ये एमआयडीसी, एपीएमसी मार्केट यांचे उच्च अधिकारी तसेच ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज असो., स्मॉल स्केल इंड. असो., क्रेडाई एमसीएचआय नवी मुंबई बिल्डर्स असो., इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्ट असो., केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो., होलसेलर्स असो., नवी मुंबई व्यापारी असो. यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सर्व संस्था प्रतिनिधींनी मनोगतातून व्यक्त केलेल्या अडी-अडचणी, सूचना आयुक्तांनी जाणून घेतल्या व त्यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित महापालिका विभागांना दिले. महापालिका क्षेत्रात उद्योग, व्यवसाय करणा-या घटकांमुळे शहराचे महत्व वाढते असे स्पष्ट करीत या घटकांशी नियमित संवाद रहावा यादृष्टीने अशा प्रकारच्या बैठका यापुढील काळात नियमित आयोजन करण्यात येतील असे आयुक्तांनी सांगितले.
उद्योग, बांधकामे व व्यवसायासाठी लागणा-या विविध परवानग्या, प्रमाणपत्रे जलद व सहजपणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन कार्यपद्धतीचा अंगिकार करून कार्यप्रणालीत सुधारणा व गतीमानता आणण्याच्या दृष्टीने एक खिडकी संकल्पनेनुसार कार्यवाही सुरू असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. पुनर्विकासांतर्गत होणा-या बांधकामांमुळे शहराची लोकसंख्येत आगामी काळात पडणारी लक्षणीय भर लक्षात घेता शहराला भविष्यात असलेली पाण्याची गरज लक्षात घेऊन बांधकामे करताना महानगरपालिकेच्या अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्रांतील शुध्दीकरण केलेल्या पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा वापर बांधकामासाठी व पिण्याव्यतिरिक्त इतर बाबींसाठी करावा व पिण्याच्या पाण्याची बचत करावी असे आयुक्तांनी पुन्हा एकवार सर्वांना सांगितले. काही गोष्टी सामाजिक जबाबदारी म्हणून करणे गरजेचे असते याची आयुक्तांनी जाणीव करून दिली. मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतील क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी १०० दिवसांच्या कृती आराखड्यामधील सात कलमांमध्ये गुंतवणूकीस प्रोत्साहन हे देखील एक महत्वाचे कलम असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करताना ही बेठक महत्वाची होती.
स्वच्छ सर्वेक्षणातील महत्वाचा भाग असलेल्या नागरिकांचा प्रतिसाद अर्थात सिटीझन फिडबॅक नोंदविण्यास स्वच्छ भारत मिशनमार्फत सुरूवात झाली असून https://sbmurban.org/feedback या लिंकवर क्लिक करून नागरिक शहर स्वच्छतेविषयीचा आपला अभिप्राय ॲपवर नोंदवू शकतात. त्यानुसार प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने आपल्या मोबाईलवरून शहराच्या सर्वोत्तम मानांकनासाठी सर्वेक्षणात विचारल्या जाणा-या १० प्रश्नांची सर्वोत्तम उत्तरे देऊन आपल्या नवी मुंबई शहराचे मानांकन उंचवावे असे आवाहन करण्यात आले आहे. याविषयी बैठकीत माहिती देण्यात आली व अभिप्राय नोंदवून प्रात्यक्षिक करण्यात आले. अशाप्रकारे प्रत्येकाने आपले कुटुंबिय, मित्र – परिवार, कार्यालयीन सहकारी यांनाही अभिप्राय नोंदविण्यास प्रोत्साहीत करावे असे यावेळी सूचित करण्यात आले. अशाप्रकारे आयुक्तांनी विशेष बैठक आयोजित करून आमच्या समस्या जाणून घेतल्या व त्याच्या निराकरणासाठी ठोस पावले उचलण्याच्या दृष्टीने आश्वस्त केल्याबद्दल बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक यांनी आभार व्यक्त केले.
