संत गाडगेबाबांच्या संदेशाचे अनुकरण करीत नवी मुंबईतील गोठिवली तलाव परिसरात ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ मोहीम
नवी मुंबई, दि. २४: स्वच्छतेचा मंत्र स्वकृतीतून पटवून देणारे थोर संत गाडगे महाराज यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून स्वच्छ सर्वेक्षण २०२४ च्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घणसोली विभागात लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
घणसोली विभागातील राजीव गांधी तलाव गोठिवली या ठिकाणी तलावाचा जलाशय व परिसराची स्वच्छता करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, परिमंडळ २ उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड व घनकचरा व्यवस्थापन परि. २ उपआयुक्त संतोष वारूळे यांच्या नियंत्रणाखाली घणसोली विभागाचे सहा.आयुक्त संजय तायडे व स्वच्छता अधिकारी विजय पडघन यांच्या माध्यमातून ही ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ मोहीम राबविण्यात आली.
यामध्ये संत निरंकारी सेवा संस्थेचे पदाधिकारी सदानंद पाटील व संस्थेच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छताकर्मी सहभागी होते. तलाव परिसर स्वच्छ करण्यासोबतच तलावाचा जलाशयही तराफे आणि होडीमध्ये जलाशयात जाऊन स्वच्छ करण्यात आला. स्वच्छता मोहीमा राबविताना व्यापक जनसहभागावर भर देण्यात येत आहे.
