नवी मुंबईत ‘स्वच्छता ही सेवा’ या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत दिव्यांग मुलांनी खेळला पर्यावरणपूरक टाळ्यांचा गरबा
नवी मुंबई, दि. २७: ‘स्वच्छता ही सेवा’ या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या ईटीसी दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्रामध्ये स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच सध्या सुरू असलेल्या नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून ईटीसी केंद्रातील दिव्यांग मुलांसाठी ‘क्लॅप ऑन गरबा’ या विशेष कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी आवर्जून उपस्थित राहून गरबा खेळणा-या सहभागी मुलांचे कौतुक केले तसेच दिव्यांग मुलांकरिता निखळ आनंददायी असा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल ईटीसी केंद्र संचालक व शिक्षकांचे कौतुक केले.
ईटीसी केंद्र संचालिका डॉ. अनुराधा बाबर यांनी ‘क्लॅप ऑन गरबा’ मध्ये हाताने टाळी वाजवून गरबा खेळत, दांडिया न वापरता अप्रत्यक्षरित्या झाडांचे संरक्षण करण्याचा अप्रत्यक्ष संदेश प्रसारित करण्यात आला असे सांगितले. याप्रसंगी अभियंता श्री.वैभव देशमुख उपस्थित होते. नवी मुंबई महापालिकेकडून ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमामध्ये महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची यावेळी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमामध्ये ईटीसी केंद्रातील सर्व दिव्यांग मुला-मुलींनी गरब्याचा रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख परिधान करून या कार्यक्रमाचा उत्स्फुर्त आनंद घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन ईटीसी केंद्राचे शिक्षण व्यवस्थापक, अधिक्षक यांनी नेटकेपणाने केले.
