गडचिरोली-चिमूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट
गडचिरोली, दि. ७ : महाराष्ट्र आणि छत्तीसगडला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३०च्या गडचिरोली जिल्ह्यातील दुरवस्थेचा मुद्दा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमकपणे प्रशासनासमोर मांडला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी निर्माण झालेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि वाढलेला अपघाताचा धोका याकडे लक्ष वेधण्यासाठी पक्षाच्या शिष्टमंडळाने ६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी अविष्यांत पांडा यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, या भेटीनंतर अवघ्या २४ तासांच्या आत प्रशासनाकडून महामार्गाच्या डागडुजीची कामे सुरू करण्यात आली आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गडचिरोली-चिमूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. यावेळी जिल्ह्यातील महत्त्वाच्या वाहतूक मार्गाची झालेली दयनीय अवस्था जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. रस्त्याच्या देखभालीकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही शिष्टमंडळाने केला.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० हा गडचिरोली जिल्ह्यातून छत्तीसगडकडे जाणारा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असतानाही रस्त्याच्या अनेक भागांत खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की वाहनचालकांना वेग कमी करून अत्यंत सावधपणे प्रवास करावा लागत आहे.
या परिस्थितीचा फटका स्थानिक नागरिकांसह विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना बसत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली असून, विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक गंभीर बनत असल्याचे शिष्टमंडळाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेत संबंधित कनिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ कानउघाडणी केली. महामार्गाची प्रत्यक्ष स्थिती लक्षात घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर प्रशासनाच्या हालचालींना वेग आला असून, २४ तासांच्या आत रस्त्याच्या डागडुजीचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे.
दरम्यान, महेश केदारी सध्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत मतदारसंघातील विविध भागांना भेटी देत तेथील स्थानिक समस्या जाणून घेण्याचे काम ते करत आहेत. या दौऱ्यादरम्यान नागरिकांकडून समोर येणाऱ्या प्रश्नांची माहिती घेऊन ती संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवण्यावर पक्षाने भर दिला आहे.
एनएच-९३०च्या दुरवस्थेचा प्रश्नही याच दौऱ्यातून प्रशासनासमोर आणण्यात आला. केवळ तक्रार करून न थांबता संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष पाठपुरावा केल्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाल्याचा दावा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख पवन गेडाम, सहसंपर्कप्रमुख डॉ. श्रीकांत बनसोड, संघटक नंदू कुंभरे, शहरप्रमुख पप्पू शेख, युवासेना शहरप्रमुख प्रफुल्ल कोसे, युवासेना उपजिल्हाप्रमुख चेतन उरकुडे, अमोल कुळमेथे, माजी सरपंच तुषार मडावी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महामार्गाची तात्पुरती डागडुजी सुरू झाली असली तरी रस्त्याची दीर्घकालीन आणि टिकाऊ दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. खड्डे बुजवण्याबरोबरच खराब झालेल्या भागांची योग्य पद्धतीने दुरुस्ती आणि आवश्यक ठिकाणी डांबरीकरण झाल्यासच या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होऊ शकणार आहे. त्यामुळे प्रशासन पुढील काळात या कामाचा दर्जा आणि सातत्य राखते का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
महेश केदारी सध्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत ते मतदारसंघाचा दौरा करत आहेत. तेथील समस्या जाणून घेत आहेत. याच दरम्यान स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३०च्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले.

