अशा कितीही चौकश्या केल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही : राज ठाकरे
मुंबई: काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सकाळी ईडी च्या कार्यालयात कोहिनूर मिल प्रकरणी चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. या वेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला, मुलगी उर्वशी, मुलगा अमित, सून मिताली आणि बहीण होते. साधारण ११ वाजता ईडी कार्यालयात गेलेल्या राज ठाकरे यांची रात्री साडेआठ वाजेपर्यंत चौकशी करण्यात आली.
यानंतर ते आपल्या कृष्णकुंज या निवासस्थानी रवाना झाले. या प्रसंगी त्यांचं कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याची प्रयत्नही केला. पण त्यांनी माध्यमांच्या कोणत्याच प्रश्नांची उत्तरं दिली नाही. या वेळी कार्यकर्त्यांच्या गराड्यात असताना ते म्हणाले की, “मी त्यांना एकच गोष्ट सांगून आलोय ह्या अशा कितीही चौकश्या केल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही” पुढे ते म्हणाले योग्यवेळी मी तुमच्याशी बोलेन.
या प्रकरणी या आधी माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे सुपुत्र उन्मेष जोशी यांचीही ईडी मार्फत चौकशी करण्यात आली आहे.